खाटा 365, रुग्ण 530!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 डिसेंबर 2016

नागपूर - सार्वजनिक आरोग्य विभागाकडून डागा स्मृती शासकीय रुग्णालयात 500 खाटांची मंजुरी मिळाली; पण मनुष्यबळाअभावी अंमलबजावणी झालेली नाही. सध्या रुग्णालयात 365 खाटा आहेत. मात्र, रुग्णांची संख्या दररोज 530च्या वर असते.

नागपूर - सार्वजनिक आरोग्य विभागाकडून डागा स्मृती शासकीय रुग्णालयात 500 खाटांची मंजुरी मिळाली; पण मनुष्यबळाअभावी अंमलबजावणी झालेली नाही. सध्या रुग्णालयात 365 खाटा आहेत. मात्र, रुग्णांची संख्या दररोज 530च्या वर असते.

डागा रुग्णालय हाउसफुल्ल असताना, मनुष्यबळ मात्र वाढवून मिळत नाही. प्रशासनाने पाचशे खाटांसाठी आवश्‍यक मनुष्यबळाचा तपशील गोळा केला. उपसंचालक कार्यालयाला सादर केला; परंतु अद्याप मनुष्यबळवाढीचा प्रस्ताव कागदोपत्रीच आहे. महिलांच्या प्रसूतीसाठी डागा रुग्णालय प्रसिद्ध आहे. राज्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) आणि इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालया (मेयो) पेक्षा जास्त प्रसूती येथे होतात. राज्यात प्रसूतिसंख्येच्या बाबतीत डागा दुसऱ्या क्रमांकावर असताना सुविधांबाबत पिछाडीवर आहे. अवघे 9 प्रसूतितज्ज्ञ आणि 76 परिचारिकांच्या भरोशावर वर्षभरात 15 हजार प्रसूतींचा पल्ला डागा रुग्णालय गाठते. सध्या महिला व बाल विभागाचे विस्तारीकरण करण्यासाठी वैद्यकीय अधीक्षक डॉ. सीमा पारवेकर प्रयत्न करीत आहेत. जिल्हा नियोजन मंडळाकडून मिळालेल्या 24 लाख रुपयांतून काही वर्षांपूर्वी अल्ट्रा सोनोग्राफी डॉपलर यंत्र खरेदी करण्यात आले. येथे दररोज सामान्यपणे 60 ते 65 सोनोग्राफी तर 50 प्रसूतीही होतात. नेत्ररोग विभागात अवघ्या 20 खाटा आहेत. मात्र, येथे दररोज 30 च्या वर रुग्ण असतात.

डागात मनुष्यबळाची कमतरता आहे. आहे त्या मनुष्यबळात उत्तमोत्तम सेवा देण्याचा प्रयत्न प्रत्येक डॉक्‍टर, परिचारिका तसेच चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्याचा असतो. रुग्णसेवेसोबत पोषण आहारातून कुपोषणमुक्तीचा प्रकल्प येथे राबवला जातो. पाचशे खाटांसाठी आवश्‍यक मनुष्यबळाचा अहवाल आरोग्य उपसंचालक कार्यालयाकडे सादर केला आहे.

-डॉ. सीमा पारवेकर, वैद्यकीय अधीक्षक, डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालय, नागपूर.

Web Title: daga smruti hospital issue