दहेगाव येथे ट्रकने महिलेला चिरडले, रस्ता बांधकामाने केला घात

दहेगाव येथे ट्रकने महिलेला चिरडले, रस्ता बांधकामाने केला घात

खापरखेडा (जि. नागपूर) : दहेगाव ते खापरखेडा निर्माणाधीन मार्गावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या रेतीच्या ट्रकने एका महिलेला चिरडल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. माधुरी राहुल मोडक (वय 30, रा. रनाळा, कामठी) असे मृतेचे नाव आहे. माधुरी मुलासह तिच्या माहेरी वलनी येथे भाऊबीज आटोपून सासरी परत जात होती. 
या घटनेत माधुरीचे वडील रमेश डोंगरे (वय 59, रा. वलनी वस्ती) व मुलगा शामित (वय 12) हे थोडक्‍यात बचावले. घटनेनंतर चालक पसार झाला तर नागरिकांचा संताप अनावर झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण होते. मृत माधुरीचा मृतदेह रस्त्यावरच ठेवून रस्ता बांधकाम कंत्राटदाराला बोलावून मोबदला देण्याची मागणी केली. खापरखेडा पोलिसांनी दंगा नियंत्रक पथकाला पाचारण करून परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. चार तासांनंतर रस्ता बांधकाम कंत्राटदाराने दहा लाख रुपयांचा मोबदला व अन्य अटी मान्य केल्यावर सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास माधुरीचा मृतदेह रस्त्यावरून उचलला. 
मिळालेल्या माहितीनुसार, माधुरी भाऊबीजेसाठी तिच्या माहेरी वलनी येथे मुलगा शामितसह आली होती. कामठीला बसने परत जातेवेळी वडील रमेश डोंगरे यांनी दोघांना दहेगाव-कामठी मार्गावरील जोडरस्त्यावरील बसस्थानकावर सोडून देण्यासाठी येत होते. निर्माणाधीन मार्गावर पोहोचल्यावर वडील रमेश यांनी त्यांची दुचाकी तयार झालेल्या रस्त्यावर चढविली. यातच त्यांचा तोल गेल्याने तिघेही वाहनासह खाली पडले. याचवेळी समोरून येणाऱ्या ट्रकखाली माधुरीचे डोके आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. माधुरीचे पती राहुल हे कळमना मार्केटमध्ये काम करीत असल्याची माहिती मिळाली आहे. 
पोलिसांची मध्यस्थी आली कामी 
माधुरीचा मृत्यू झाल्यानंतर नागरिकांत प्रचंड असंतोष निर्माण झाला होता. मुलगा शामित व वडील रमेश डोंगरे यांच्यासाठी माधुरीचा मृत्यू धक्कादायकच होता. घटनेनंतर नातेवाईक व परिसरातील ओळखीच्या लोकांनी एकच गर्दी केली. या अपघातासाठी कंत्राटदाराला जबाबदार धरून कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. खापरखेडा पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. अखेर पोलिसांनी मध्यस्थी केल्यानेच नागरिकांचा संताप ओसरला.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com