रोजचीच "काळ्या पाण्याची सजा'!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 नोव्हेंबर 2019


शहरातील अनेक भागात गढूळ, काळे मळके, दूषित पाणी दररोज नळाद्वारे मिळत आहे. नगरपंचायत कार्यालयाला हे माहीत असूनदेखील तेच पाणी पिण्यास पुरविले जात असल्याने पारशिवनीकर या विरोधात तीव्र संतप्त आहेत. यावरून नागरिकांत नगरपंचायत मुख्याधिकारी, नगरपंचायत अध्यक्षासह सदस्यांविरोधात आक्रोश उफाळून आला असून प्रहार संघटनेतर्फ सोमवारी तहसीलदारांना निवेदन दिले. पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

पारशिवनी(जि.नागपूर)ः गेल्या वर्षभरापासून नळातून काळे दूषित पाणी पिण्यासाठी वितरित होत असल्याने प्रशासन व नगर परिषदेने येथील नागरिकांना जणू काळ्या पाण्याची सजा तर ठोठावली नाही ना, असा प्रश्‍न केला जात आहे. म्हणून त्रस्त नागरिक व सर्वपक्षीय नेत्यांनी मंगळवारी प्रशासनाला जाब विचारण्यासाठी नगरपरिषदेत घेराव करण्याचे पक्‍के केले आहे.

शहरातील अनेक भागात गढूळ, काळे मळके, दूषित पाणी दररोज नळाद्वारे मिळत आहे. नगरपंचायत कार्यालयाला हे माहीत असूनदेखील तेच पाणी पिण्यास पुरविले जात असल्याने पारशिवनीकर या विरोधात तीव्र संतप्त आहेत. यावरून नागरिकांत नगरपंचायत मुख्याधिकारी, नगरपंचायत अध्यक्षासह सदस्यांविरोधात आक्रोश उफाळून आला असून प्रहार संघटनेतर्फ सोमवारी तहसीलदारांना निवेदन दिले. पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या प्रश्‍नावरून नागरिकांत प्रशाषनाविरोधात उद्रेक होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.
सोमवारी विभागीय आयुक्त संजीवकुमार यांच्याकडे याबाबत तक्रार दाखल करण्यात आली असून जिल्हाधिकाऱ्यांकडेही नगरपंचायत कार्यालयाच्या भोंगळ कारभाराची तक्रार उदयसिंग यादव यांच्यासह पारशिवनीकरांनी केली आहे. मंगळवारी या विरोधात सर्वपक्षीय आंदोलन करण्यात येणार आहे. पाणीपुरवठा समितीचे सभापती हे नागरिकांना शुद्‌ध पाणी देण्यास असमर्थ ठरले, ठराव घेऊन तो प्रशासनाकडे पाठविला. यापलीकडे ते पाठपुरावा करून पाइपलाइन बदलविण्यात अपयशी ठरल्याचा आरोप नागरिकांनी केला. पारशिवनीकरांना "काळ्या पाण्याची सजा' भोगावी लागत असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया बबलू शेख, कमल गडकनौजे, हर्षल गजभिये, मुश्‍ताक पठाण, विजय बोथरा, राहुल बोथरा, प्रकाश भुते, राजू भोयर, राजकुमार राऊत, संजय व्यास, जलिम शेख, नरेश भिवगडे व इतरांनी दिली.
 
ही काळ्या पाण्याची समस्या आहे. याकरिता दुरुस्ती, पाइपलाइन बदलविण्याकरिता लागणाऱ्या निधीची मागणी प्रशासनाकडे केली आहे. ही पाइपलाइन बदलण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची गरज असल्याने पाइपलाइन बदलविता आली नाही. तसेच निधी उपलब्ध झाला नाही. त्यामुळे पाणी दूषित येत आहे. तरीही नगरपंचायत प्रशासनाच्यावतीने शुद्ध पाणी नागरिकांना मिळावे, याकरिता इतर प्रयत्न युद्धस्तरावर सुरू आहेत.
भारत नंदनवार
मुख्याधिकारी, पारशिवनी  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Daily "black water punishment"!