खोडकिडीच्या प्रादुर्भावाने सोयाबीन हातचे जाण्याची वेळ, शासनाने करावी शेतकऱ्यांना मदत

सूरज पाटील
Sunday, 20 September 2020

सोयाबीन खोडकिडीच्या तावडीत सापडल्याने हातचे पीक जाण्याची वेळ आली आहे. सोयाबीन पिकाच्या उत्पन्नात घट होणार असल्याने शेतकऱ्यांनी लागवड, निंदणी व खत यांचा केलेला खर्चही निघणे कठीण आहे. या पिकांवर झालेल्या खोडकिडीमुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

यवतमाळ : यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना विविध संकटांना तोंड द्यावे लागत आहे. पेरणीनंतर सोयाबीनचे बियाणे बोगस निघाले. त्यामुळे शेतात दुबार पेरणी करावी लागली. यातून सावरत नाही तोच सोयाबीनवर खोडकिडीचा प्रादुर्भाव आढळून आला. सततचा पाऊस, फवारणी करूनही काही फायदा होताना दिसत नाही. परिणामी सोयाबीनचा शेतकऱ्यांना चांगलाच फटका सहन करावा लागणार आहे.

जिल्ह्यात कपाशीनंतर जवळपास सव्वातीन लाख हेक्‍टर क्षेत्रावर सोयाबीन पिकाची लागवड करण्यात आली आहे. यातही बोगस बियाण्यामुळे अनेक शेतकऱ्यांना दुबार व तिबार सोयाबीन पेरणी करावी लागली. पिकाची वाढ होत असतानाच खोडकिडीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. सोयाबीन खोडकिडीच्या तावडीत सापडल्याने हातचे पीक जाण्याची वेळ आली आहे. या पिकांवर झालेल्या खोडकिडीमुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनामुळे शेतकरी आधीच संकटात सापडले आहेत.

सोयाबीन पिकाच्या उत्पन्नात घट होणार असल्याने शेतकऱ्यांनी लागवड, निंदणी व खत यांचा केलेला खर्चही निघणे कठीण आहे. सोयाबीनला नगदी पीक म्हणून ओळखले जाते. तीन महिन्यांत पीक हातात येऊन पैसे हातात पडत असल्याने शेतकरी सोयाबीनची लागवड करतात. दिवाळीत पीक निघून बाजारात विक्री करता येते. त्यातून येणाऱ्या पैशांत शेतकरी उधार उसनवारीची परतफेड करून दिवाळीचा सण उत्साहात साजरा करतात.

जाणून घ्या : ही लक्षणं देतात शरीरातील कमी ऑक्सिजनची पूर्वसूचना; हे उपाय करा आणि मिळवा नैसर्गिक ऑक्सिजन

शासनाने नुकसानभरपाई द्यावी

पीक पूर्ण हातून जाण्याच्या मार्गावर असल्याने शेतकऱ्यांची दिवाळीदेखील अंधारात जाणार आहे. किडीमुळे एकरी एक ते दोन क्विंटल सोयाबीन होण्याचा अंदाज आहे. त्यातून काढणीचा खर्चही निघणार नाही. किडीचा सर्वाधिक फटका यवतमाळ, बाभूळगाव, राळेगाव, उमरखेड, महागाव, नेर, दिग्रस, पुसद, तालुक्‍यातील शेतकऱ्यांना बसणार आहे. कृषी विभागाने तत्काळ दखल घेऊन पंचनामे करावेत व नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

फवारणीचा खर्च पाण्यात

सोयाबीनचे पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी केंद्रातून महागडी औषधी आणून फवारणी केली. त्याचा काहीही फायदा झाला नाही. उलट खर्च व कर्जात वाढ झाली. पाऊस व पीक बघून हातात दोन पैसे पडतील, शेतकऱ्यांच्या या स्वप्नावरही पाणी फेरले गेले आहे.

अवश्य वाचा : व्वा व्वा! वरुडची संत्री जाणार बांगलादेशाला

शेतकऱ्यांचा वालीच नाही

मूग हातून गेले, आता सोयाबीन जाण्याच्या मार्गावर आहे. पावसामुळे कपाशीची बोंडे गळून पडत आहेत. आधीच कोरोनामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यात आता हातात उत्पन्न कमी येणार आहे. शेतकऱ्यांच्या समस्यांवर बोलायला कुणीही तयार नाहीत. एक ना अनेक समस्यांनी बळीराजाला घेरले असतानाच वालीही उरला नाही. मदतीची अपेक्षा कुणाकडे करावी, हा प्रश्‍न त्यांना पडत आहे.

(संपादन : दुलिराम रहांगडाले)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Damage to soybeans due to infestation