दामिनी पथक झाले स्मार्ट

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 जानेवारी 2017

डिलिव्हरिंग चेंज फोरमच्यावतीने भारतात २४ आणि २५ जानेवारीला मुंबईत आंतरराष्ट्रीय परिषद होत आहे. जगभरात उद्योग, प्रशासन, कला आणि तंत्रज्ञान क्षेत्रात नेत्रदीपक बदल घडविणाऱया 'चेंज मेकर्स'चा सहभाग हे परिषदेचे वैशिष्ट्य आहे. दोन दिवसांच्या परिषदेत विविध विषयांवर चर्चासत्रे, नेटवर्किंग आणि ज्ञानाची देवाण-घेवाण होणार आहे. परिषदेच्या पार्श्वभूमीवर 'सकाळ' समुह महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासासाठी पाठपुरावा करीत असलेल्या क्षेत्रांमध्ये नेमके काय घडते आहे, काय घडवावे लागेल याचा विभागनिहाय आढावा घेत आहोत.
डिलिव्हरिंग चेंज फोरम
२४ व २५ जानेवारी २०१७ 
नेहरू सेंटर, मुंबई
अधिक माहिती व सहभागासाठी क्लिक करा
www.deliveringchangeforum.com

शहरात छेडखानींच्या घटनांत कमालीची वाढ झाल्यामुळे पोलिस आयुक्‍तांना विशेष प्रयत्न करणे गरजेचे होते. त्यासाठी ‘रोड रोमिओं’वर नियंत्रण मिळविण्यासाठी दामिनी पथक तयार करण्यात आले. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाअंतर्गत दामिनी पथक शहरात कार्यरत आहेत. शहरातील ‘रोड रोमिओं’वर ‘वॉच’ ठेवण्यासाठी दामिनी पथकाला सक्रिय करण्यात आले.  शहरातील चार दामिनी पथकांमध्ये २० महिला पोलिस कार्यरत आहेत. राज्यात अशाप्रकारचा हा एकमेव प्रयोग आहे.

दामिनी पथकाला विशेष वाहनांसह ‘स्पाय कॅमेरा’ देण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील बगीचे, तलाव परिसरात चित्रीकरण करून पुरावा गोळा केल्यानंतर कारवाईचा धडाका दामिनी करीत आहेत. शहरातील गजबजलेल्या ठिकाणी दामिनी पथकांचे वाहन गस्त घालीत आहेत. महिलांना त्रास देणाऱ्या मजनूंची जबरदस्त धुलाई दामिनी करतात. त्यानंतर लगेच पोलिस नियंत्रण कक्षाला सूचना देऊन संबंधित परिसरातील पोलिस ठाण्यात हजर करतात. अंबाझरी गार्डन आणि फुटाळा तलावावर युवक-युवतींची चांगलीच गर्दी असते. येथे छेडखानीचे प्रकार नेहमीच घडतात. मात्र, दामिनी पथक कार्यरत झाले तेव्हापासून छेडखानींवर नियंत्रण मिळविण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिस निरीक्षक शुभदा संखे दामिनी पथकाच्या प्रमुख आहेत. त्यांच्या मार्गदर्शनात पथक शहरातील प्रत्येक गार्डनसमोर गस्त घालते. शहरातील प्रमुख महाविद्यालयाच्या समोर दामिनी पथकाचे वाहन उभे असते. जर कुणी छेडखानी केली तर महिला पोलिसांकडून मजनूंची धुलाई करण्यात येते. त्यामुळे अन्य मुलींना सुरक्षित असल्याची जाणीव होते तसेच कुणी छेडखानी करण्याचा प्रयत्न करीत नाहीत. 

२०१५ मध्ये दामिनी पथकाची स्थापना करण्यात आली. पहिल्याच वर्षी १११ युवकांवर पथकाने कारवाई केली. हाच आकडा २०१६ मध्ये चारशेवर गेला आहे. दिवसेंदिवस या पथकाचा प्रभाव वाढत आहे. पथकाकडे असलेल्या ‘स्पाय कॅमेरा’मुळे छेडखानी करणाऱ्या युवकांवर नजर ठेवली जाते. सध्या दामिनी पथक ‘भरोसा सेल’अंतर्गत कार्यरत आहे. पथकातील प्रत्येक महिला पोलिस कर्मचाऱ्याला विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे टारगट युवकांशी दोन-दोन हात  करायचे असल्यास दामिनी पथकातील महिला कर्मचारी सक्षम आहेत. मुलींना चिडवणे, शीळ घालणे, विशिष्ट आवाज करून लक्ष आकर्षित करणे, शेरेबाजी करणाऱ्यांवर दामिनींचा ‘वॉच’ आहे.

Web Title: Damini team was smart