आता परतीच्या पावसावर धरणांची तहान

File photo
File photo

अमरावती : पावसाळ्याचे मोजके दिवस शिल्लक असताना धरणांतील जलसाठा पुरेसा झालेला नाही. पावसाने पाठ फिरवली असून व खंडित पाऊस बरसत असल्याने विभागातील धरणांमध्ये निम्माही जलसाठा होऊ शकलेला नाही. मोठ्या, मध्यम व लघू प्रकल्पांत ऑगस्टचा पंधरवडा संपला त्यावेळी 41 टक्के जलसाठा होऊ शकला. गतवर्षीइतकाच यंदाही साठा झाल्याने पुन्हा परतीच्या पावसावर भिस्त अवलंबली आहे. गतवर्षी परतीच्या पावसाने धरणांतील साठा वाढविला तरी तो पर्याप्त ठरू शकला नाही व टॅंकर्सची संख्या वाढली.
अमरावती विभागात नऊ मोठे, 24 मध्यम व 469 लघू प्रकल्प आहेत. या सर्व धरणांची मिळून जलसंचय क्षमता 3174 दलघमी इतकी आहे. यावर्षी 18 ऑगस्टला त्यामध्ये 1357 दलघमी (42.76 टक्के) जलसाठा झाला. जूनमध्ये पावसाने अखेरच्या सप्ताहात हजेरी लावली. त्यानंतर तो जुलैमध्ये खंडित स्वरूपात बरसला व ऑगस्टच्या पहिल्या सप्ताहात दमदार हजेरी लावली. ऑगस्टमधील पावसाने विभागातील आठ धरणांचे दरवाजे उघडण्याची वेळ आली. ऑगस्टमधील पावसाची सरासरी बघता जलसाठा चांगला होईल ही अपेक्षा मात्र दुसऱ्याच आठवड्यात भंग पावली. पावसाने पाठ फिरवली. पाणीपुरवठ्यात मात्र कमी झाली नाही व उपसा कायम राहिल्याने जलपातळीतील घटही तशीच कायम आहे. यावर्षीही पाऊस गतवर्षीप्रमाणेच बरसला व धरणांतील साठ्यातील वाढही बरोबरी साधणारी आहे. गतवर्षी याचवेळी विभागातील धरणांमध्ये 1326 दलघमी जलसाठा होता.
सप्टेंबरमध्ये झालेल्या परतीच्या पावसाने धरणांमधील जलसाठ्यात वाढ नोंदविल्या गेली. यंदाही परतीच्या पावसावरच अवंलबून राहण्याची वेळ आता आली आहे. जुलै व ऑगस्ट ही दोन महिने दमदार पावसाची मानल्या जातात. मात्र, या दोन्ही महिन्यात खंडित स्वरूपाचाच पाऊस आतापर्यंत झाला आहे. ऑगस्ट महिन्यातील दुसरा आठवडा पूर्णतः कोरडा गेला. तिसऱ्या सप्ताहात बरसण्याचा अंदाज अद्याप नाही. सप्टेंबरमध्ये परतीच्या पावसाला प्रारंभ होईल. त्याचा भरवसा फार नाही. त्यामुळे यंदाही पाण्याची टंचाई जाणवणार असल्याचे संकेत मिळू लागले आहेत. नोव्हेंबर महिन्यातील जलसाठ्यावर पाणी आरक्षण निश्‍चित केल्या जाते. तोपर्यंत जलसाठ्याची सरासरी गाठल्या गेली नाही, तर यंदाही विभागांत पाणीपुरवठ्याचे टॅंकर्स वाढण्याची शक्‍यता नाकारता येणार नाही. सरलेल्या उन्हाळ्यात विभागांत 467 टॅंकर्सने 42 तालुक्‍यांतील 418 गावांना पाणीपुरवठा करावा लागला. आगामी उन्हाळ्यात ती स्थिती निर्माण होण्याची शक्‍यता पावसाचा अंदाज बघता वर्तविण्यात येऊ लागली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com