पुलाअभावी धोकादायक प्रवास सुरूच 

file Photo
file Photo

गडचिरोली : जिल्हा निर्मितीला 35 वर्षांचा कालावधी उलटला, मात्र अनेक मार्गांवर पुलाचे बांधकाम न झाल्याने नागरिकांना नदीपात्रातून धोकादायक प्रवास करावा लागत असल्याचे सर्वत्र दिसून येत आहे. 
भामरागड येथील पर्लकोटा नदी, बोरमाळा घाटावरील वैनगंगा, गडअहेरी नाला, किष्टापूर नाला, येरमणार नाला, लाहेरी, सिरोंचा, कोरची, धानोरा, मुलचेरा, चामोर्शी, गडचिरोली तसेच एटापल्ली तालुक्‍यात दहाच्या वर रस्त्यावर पुलाची गरज आहे. मात्र, प्रशासनाकडून या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याने पावसाळ्याच्या दिवसात शेकडो गावांना पुराचा फटका बसतो. याशिवाय कित्येक गावांचा दोन ते तीन महिने तालुका मुख्यालयाशी संपर्क नसतो. गडचिरोली शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेले बोरमाळा गाव हे चंद्रपूर जिल्ह्यात येते. परंतु गडचिरोली जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण जवळ असल्याने येथील नागरिक कामासाठी येथे येत असतात. मात्र, वैनगंगा नदीवर पूल नसल्याने पावसाळ्याच्या दिवसांत त्यांना डोंग्याने तर पावसाळ्यानंतर पायीच नदी पार करावी लागते. पुलाचे बांधकाम करण्यात यावे याबाबत ग्रामस्थांनी अनेकदा चंद्रपूर व गडचिरोली येथील जिल्हा प्रशासनाकडे निवेदन दिले. मात्र, या निवेदनावर विचारसुद्धा करण्यात आला नाही. या मार्गावर वर्दळ नसल्याने पुलाचे बांधकाम शक्‍य नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे बोरमाळावासींची पायपीट थांबण्याची चिन्हे दिसून येत नाहीत. गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम गावामध्ये तर बिकट परिस्थिती आहे. पावसाळ्याच्या दिवसांत पाचशेच्या वर गावांना पुराचा फटका बसतो. आठवडाभर वाहतूक बंद असते. त्यामुळे शिक्षण, आरोग्य तसेच नागरिकांच्या दैनंदिन कामावर परिणाम होतो. भामरागडलगत असलेल्या पर्लकोटा नदीवर पूल आहे, परंतु तो ठेंगणा असल्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांत नेहमीच पुराची समस्या असते. आठवडी बाजार अनेकदा पाण्याखाली जातो. नवीन पुलाच्या बांधकामाला मंजूरी मिळाली, परंतु दोन वर्षांचा कालावधी उलटूनही बांधकाम सुरू झाले नाही. भामरागड-आलापल्ली, लाहेरी, कोठी, मन्नेराजाराम, बिनागुंडा नारगुंडा या मार्गांवरही पुलाचे अडथळे आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com