धोकादायक कामात जुंपले जातेय बालपण

Sakal-Special
Sakal-Special

नागपूर - कायद्याची पायमल्ली करून अनेक कारखान्यांमध्ये धोकादायक कामांसाठी बालकामगारांना जुंपले जात आहे. कमी वेतनात बालकामगार मिळवून देणारे रॅकेट सर्वत्र सक्रिय आहेत. नागपूर रेल्वे चाइल्ड लाइनच्या सजगतेने अलीकडच्या काळात २९ बालकामगारांची सुटका करण्यात आली. यात ३ मुलींचाही समावेश आहे. त्यांना रेल्वेतून कारखान्यांमध्ये कामासाठी नेले जात होते.

मुंबईसह राज्याच्या अन्य ठिकाणी प्रामुख्याने झारखंड, मध्य प्रदेश, छत्तीसगडच्या मागास भागातून बालकामगार उपलब्ध होतात. दलालांकडून सोयीचे माध्यम म्हणून रेल्वेतूनच त्यांची वाहतूक केली जाते. ही बाब लक्षात घेत नागपूर स्थानकावरील चाइल्ड लाइनने कंबर कसली आहे. १२ जणांच्या पथकाकडून २४ तास डोळ्यांत अंजन घालून गाड्यांमधील हालचालींवर लक्ष ठेवले जाते. त्याचे फलितही दिसून येत आहे. अलीकडच्या काळात वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये बालमजुरीसाठी नेली जाणारी २६ मुले आणि ३ मुली अशा एकूण २९ बालकांची सुटका करून बालमजुरीच्या दलदलीपासून दूर ठेवण्यात यश आले.

जीव मुठीत धरून काम
काच कारखाने, चॉकलेट कंपन्यांमध्ये उकळते द्रवण हाताळावे लागते. थोडीशीही चूक जिवावर बेतणारी ठरते. ही मुले जीव मुठीत धरून काम करतात, त्या बदल्यात मिळणारा मोबदला दरमहा केवळ दीड ते तीन हजारांपर्यंतच असतो.

मुंबईत वास्तव्याचे सर्वाधिक आकर्षण
झारखंड, मध्य प्रदेश, छत्तीसगड आदी राज्यांतील मागास भागांमधील अगदी गरीब घरातील मुलांना दलाल हेरतात. मुंबईत वास्तव्य सर्वांत मोठे प्रलोभन ठरते आणि मुले कामासाठी सहज तयार होतात. दरमहा रक्कम मिळणार असल्याने पालकही मुलांना पाठविण्यास तयार होतात. एकदा घरून निघालेल्या मुलांना नंतर हवे त्या कारखान्यात पोहोचवून दिले जाते. 

बालकांसाठी ‘वरदान’
नागपूर रेल्वेस्थानकावर चाइल्ड लाइनची जबाबदारी वरदार आयएपीए ॲण्ड चाइल्ड वेलफेयर संस्था सांभाळत आहे. संस्थेच्या अध्यक्ष डॉ. मंगला देशकर यांच्या मार्गदर्शनात आणि समन्वयक गौरी शास्त्री देशपांडे यांच्या नेतृत्वात इथे काम सुरू आहे. एप्रिल ते ऑक्‍टोबरदरम्यान नागपूर स्थानकावर एकूण २९२ बालके एकाकी आढळली. यात २२८ मुले आणि ६४ मुलींचा समावेश आहे. त्यांचे भविष्य सुरक्षित करण्यात वरदान संस्थेचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com