बनावट दारूचा ट्रकभर साठा जप्त!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

नागपूर : उत्पादन शुल्क विभाग व धंतोली पोलिसांनी मद्य विक्रेते मुन्ना जयस्वाल यांच्या गोदामावर धाड घालून 22 लाखांचा मद्यसाठा जप्त केला. ही दारू बनावट असल्याचा संशय आहे. या कारवाईमुळे मद्य विक्रेत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

नागपूर : उत्पादन शुल्क विभाग व धंतोली पोलिसांनी मद्य विक्रेते मुन्ना जयस्वाल यांच्या गोदामावर धाड घालून 22 लाखांचा मद्यसाठा जप्त केला. ही दारू बनावट असल्याचा संशय आहे. या कारवाईमुळे मद्य विक्रेत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
मुन्ना उर्फ संजीत जयस्वाल यांची सम्राट एजन्सी नावाने मद्याचा व्यवसाय आहे. शहरातील विविध भागात त्यांचे बार व वाईन शॉप आहेत. जयस्वाल यांचे कार्यालय व घर धंतोली परिसरात बालभारती कार्यालयाजवळ आहे. मंगळवारी रात्री एक वाजताच्या सुमारास एमएच-31, सीक्‍यु-2629 क्रमांकाचे एक टिप्पर धंतोली परिसरातील रहिवासी वस्तीतून जात असल्याची गुप्त माहिती धंतोलीचे ठाणेदार दिनेश शेंडे आणि पीएसआय अनंत वडतकर यांना मिळाली. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी सापळा रचून बालभारती कार्यालय परिसरात टिप्पर अडवला. पोलिसांचे वाहन बघून वाहनचालक पळून गेला. पोलिसांनी तपासणी केली असता टिप्परमध्ये 197 पेट्या देशी दारू होती. तर पाच पेट्या इंपेरियल दारूच्या सापडल्या. पोलिसांनी गुन्हा दाखल करून 21 लाख 95 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. बालभारती कार्यालयाजवळ ताब्यात घेण्यात आलेल्या ट्रक कोठून आला, हे शोधण्यासाठी रात्री धंतोली पोलिसांनी टायरच्या चिन्हांवरून पाठलाग केला. त्यावेळी अंतरावर सुरेश जयस्वाल यांच्या घरासमोर असलेल्या एका ठिकाणाहून ते निघत असल्याचे दिसले. जयस्वाल यांचा दारूचा व्यवसाय असून त्यांच्या गोदामात अवैध धंदे चालत असावे, अशी शंका पोलिसांच्या आली. त्यांनी उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्वाती काकडे यांना माहिती दिली. धंतोली पोलिसांकडून माहिती मिळताच उत्पादन शुल्क विभागाचे अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने मुन्ना जयस्वाल यांच्या गोदामासह विविध बार व वाईन शॉप अशा एकूण 18 ठिकाणी छापे टाकले. गोदामात जवळपास 18 पेट्या हरियाणा येथील आयबी व मॅकडॉल्स दारूच्या रिकाम्या बॉक्‍स बाटल्या सापडल्या.
कारवाईत धंतोली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिनेश शेंडे, उपनिरीक्षक अनंतराव वडतकर, सहाय्यक फौजदार तिवारी, राजेश, पंढरी, गोपाल, मनोज आणि हेमराज यांचा तर उत्पादन शुल्क विभागातील निरीक्षक केशव चौधरी, दुय्यम निरीक्षक उमेश शिरभाते, रावसाहेब कोरे, सुभाष हनवते, पुरुषोत्तम बोडारे, स्नेहा पवार, महादेव कांगने यांच्या समावेश होता.
हरियाणातून दारुची तस्करी
हरियाणामध्ये स्वस्तात दारू मिळते. अधिक नफा कमवण्यासाठी जयस्वाल तेथील दारूची तस्करी करून ती रिकाम्या बाटल्यांमध्ये भरून महाष्ट्रातील चंद्रपूर व वर्धा या दारूबंदी जिल्ह्यात पाठवित असल्याचा संशय आहे. या प्रकरणात पोलिसांनी विनय जयस्वाल याला अटक करण्यात आली असून अंबरीश जयस्वाल व मुन्ना जयस्वाल यांनाही आरोपी करण्याची तयारी पोलिसांनी सुरू केली आहे.

 

Web Title: daru news