साडीत बाटल्या लपवून मद्यतस्करी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 जानेवारी 2019

नागपूर : रेल्वे सुरक्षा दलाच्या नागपूर स्थानकावरील पथकाने मद्यतस्करांना जेरीस आणले आहे. वेगवेगळ्या शक्कल लढवूनही मद्यसाठा पकडला जात आहे. साडीखालील पेटीकोट आणि शॉर्ट पॅन्टला शिवलेल्या खिशांमधून दारूच्या बाटल्या लपवून घेऊन जाणाऱ्या चार महिला तस्करांना गुरुवारी नागपूर रेल्वेस्थानकावरून ताब्यात घेण्यात आले.

नागपूर : रेल्वे सुरक्षा दलाच्या नागपूर स्थानकावरील पथकाने मद्यतस्करांना जेरीस आणले आहे. वेगवेगळ्या शक्कल लढवूनही मद्यसाठा पकडला जात आहे. साडीखालील पेटीकोट आणि शॉर्ट पॅन्टला शिवलेल्या खिशांमधून दारूच्या बाटल्या लपवून घेऊन जाणाऱ्या चार महिला तस्करांना गुरुवारी नागपूर रेल्वेस्थानकावरून ताब्यात घेण्यात आले.
राखी मधू भाट (45), रेखा चंद्रकांत जाट (37), रेखा रामराज जाट (50), बिजली सूर्यकांत जाट (45) सर्व रा. जलनगर वॉर्ड, चंद्रपूर अशी ताब्यातील तस्कर महिलांची नावे आहेत. या चारही महिला 2589 गोरखपूर-सिकंदराबाद एक्‍स्प्रेसच्या जनरल डब्यातून प्रवास करीत होत्या. ही गाडी सकाळी 10.55 वाजता नागपूर स्थानकाच्या फलाट क्रमांक तीनवर येऊन थांबली. गस्त घालणाऱ्या पथकातील उषा तिग्गा, विकास शर्मा, अर्जुन सामंतराय आणि सुषमा ढोमणे तपासणीसाठी जनरल डब्यात चढले. विशिष्ट पद्धतीच्या साडीत असणाऱ्या या महिलांच्या हालचाली संशयास्पद होत्या. शिवाय दारूचा गंधही येत असल्याने चौकशी सुरू केली. समाधानकारक उत्तरे देत नसल्याने खाली उतरवून ठाण्यात आणण्यात आले. महिला कर्मचाऱ्यांकरवी अंगझडती घेतली असता साडीखाली पेटीकोट आणि त्याखालील शॉर्टपॅन्टला खिसे आणि त्यात दारूच्या बाटल्या आढळल्या. एक एक करीत चारही महिलांकडून 25 हजार रुपये किमतीच्या दारूच्या तब्बल 384 बाटल्या हस्तगत करण्यात आल्या. हा मद्यसाठा विक्रीसाठी दारूबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात विक्रीसाठी नेत असल्याची कबुली त्यांनी दिली. वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योतिकुमार सतिजा यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण कारवाई करण्यात आली. पुढील कारवाईसाठी ताब्यातील महिलांना जप्त मद्यसाठ्यासह राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे.
17 दिवसांत 18 घटना
रेल्वे सुरक्षा दलाच्या नागपूर स्थानकावरील पथकाने नवीन वर्षाच्या पहिल्या 17 दिवसांमध्ये मद्यतस्करीच्या 18 घटना उघडकीस आणल्या आहेत. यात एकूण 1.77 लाखांचा मद्यसाठा पकडून 12 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Web Title: daru news