दर्यापूर मतदारसंघात तिकिटासाठी चुरस

File photo
File photo

दर्यापूर : लोकसभा निवडणुकीनंतर प्रचारप्रसिद्धीसह प्रत्यक्ष कामाला वेग आला आहे. गत पाच वर्षांच्या काळात विकासाचा बोलबाला असला तरी नावलौकिकाच्या विकासाबाबत मात्र खंत व्यक्त केल्या जात आहे. या वेळी मात्र निवडणुकीत कोणी विजयासाठी तर कोणी एखाद्याला पाडण्यासाठी शक्तिप्रदर्शन दाखवणार असल्याने टस्सलबाज निवडणूक होणार, हे मात्र निश्‍चित.
दर्यापूर मतदारसंघात गेल्या निवडणुकीत युती तुटल्याने मोदी लाटेत भाजपने बाजी मारली. मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी आरक्षित असल्याने उमेदवार जाहीर होण्याच्या दोन दिवसांपूर्वीच तालुक्‍यातील भंडारज येथील रमेश बुंदिले याचे नाव पाठवण्यात आले होते. त्यांना कुठलाही राजकीय वारसा नव्हता, हे विशेष. या वेळी अजून युतीचे चित्र स्पष्ट झाले नसले तरी युतीत मतदारसंघ कुणाला जाणार व युती तुटणार की होणार? हा तिढा कायम आहे. शिवाय कॉंग्रेस, राष्ट्रवादी, आरपीआय व इतर पक्षांची महायुती होणार की नाही तसेच वंचित बहुजन आघाडी स्वतंत्र लढणार हेसुद्धा स्पष्ट झाले नाही. तरी भाजपचे विद्यमान आमदार रमेश बुंदिले यांची प्रथम दावेदारी असून त्यांनी तसे प्रयत्न सुरू केले आहेत. पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांची फळी, गेल्या पाच वर्षांत केलेली विकासकामे तसेच सुरू होत असलेला विकासकामांच्या भूमिपूजनाचा धडाका, ही त्यांच्या जमेची बाजू आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या माजी अध्यक्ष भाजपच्या सीमा सावळे यांनी जिजाई प्रतिष्ठानच्या माध्यमातून मतदारसंघात महिलांची फळी तयार केली. या माध्यमातून सुमारे पंचेवीस हजार महिलांची सदस्य नोंदणी केली व राखी उद्योगातून महिलांना रोजगार देण्याचा उपक्रम सुरू केला. शिवाय युवकांना रोजगारासाठीसुद्धा त्यांनी कार्यक्रम आखला असल्याची माहिती आहे. त्याही भाजपच्या असल्याने त्यांची दावेदारीही विचारात घेतली जाऊ शकते. शिवाय युती नसली किंवा मतदारसंघ सेनेला मिळाला तर लोकसभेच्या वेळी पुन्हा सेनेत दाखल झालेले दिनेश बूब यांना पक्षप्रमुखांनी येथे उमेदवारी देणार, असा शब्द दिला होता. त्यानुसार ते व माजी शहरप्रमुख गजानन लवटे, शिवाय निवडणुकीचा पूर्वानुभव असलेले येथील माजी नगरसेवक अविनाश गायगोले तसेच दर्यापुरातून सेनेचे खंदे कार्यकर्ते समजले जाणारे बबन विल्हेकर यांचा दावा असल्याचे समजते. तथापि, महायुती जर होत असली तर कॉंग्रेस, राष्ट्रवादी, आरपीआय, युवा स्वाभिमान यापैकी कुणालाही मतदारसंघ गेल्यास दहा वर्षे सतत जनसंपर्कात राहणारे पॉवरफुल्ल म्हणून बळवंत वानखडे यांनाच उमेदवारी मिळू शकते.
कॉंग्रेसचे श्रीराम नेहर व सुधाकर तलवारे यांचे तिकिटासाठी प्रयत्न सुरू आहेत. शिवाय नुकत्याच झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मुलाखत कार्यक्रमात येथील डॉ. स्पृहा नंदिकेश्वर (डकरे) आणि आयशाबानो रशीद खान या महिलांनी उमेदवारीची मागणी केल्याचे समजते. बहुजन वंचित बहुजन आघाडीचे लोकसभेप्रमाणेच नियोजन झाले तर दर्यापूरचे नगरसेवक डॉ. संतोष कोल्हे व पुण्याचे उद्योजक अमित मेश्राम यांच्यापैकी एकाला तिकीट मिळणयाची शक्‍यता आहे.

- मिळालेली मते

2009
1. अभिजित अडसूळ (शिवसेना) - 40,606
2. बळवंत वानखडे - 25,948
3. रामेश्वर अभ्यंकर - 19,000


2014
1. रमेश बुंदिले - 64,224
2. बळवंत वानखडे - 44,642
3. अभिजित अडसूड - 33,800

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com