न्यूक्‍लिअर मेडिसीन विभाग ठरणार दिवास्वप्न 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑक्टोबर 2019

नागपूर : न्यूक्‍लिअर मेडिसीन ही वेदनारहित तसेच एखाद्या रोगाचा प्रादुर्भाव शरीरावर किती झाला आहे हे ओळखण्यासाठी महत्त्वाची उपचारपद्धती आहे. "टार्गेट थेरपी' म्हणून विकसित होत असून, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हा विभाग उभारण्यासंदर्भात आराखडा तयार झाला होता. नावीन्यपूर्ण योजनेतून पहिल्या वर्षात 25 कोटी मिळणार होते; परंतु आता हा विभाग उभारणे दिवास्वप्न ठरण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. 

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मेडिकलमध्ये नेत्ररोग विभागाच्या लॅसिक लेझरच्या उद्‌घाटन सोहळ्यात मेडिकलच्या विस्तारीकरणासाठी 75 कोटींचा निधी देण्याची घोषणा केली होती. पहिल्या वर्षी 25 कोटी मिळणार असे सांगण्यात आले होते; परंतु हे गाजर ठरण्याची शक्‍यता आहे. तत्कालीन अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी मेडिकलच्या रेडिओलॉजी, रेडिओथेरपी आणि हृदयरोग विभाग, मेडिसीन विभागप्रमुख यांच्यासह मुख्य प्रशासकीय अधिकारी परशुराम दोरवे यांची संयुक्त बैठक घेतली होती. सरकारच्या नावीन्यपूर्ण योजनेअंतर्गत न्यूक्‍लिअर थेरपी ही एक्‍स-रे आणि सीटीस्कॅन यांच्या निदान उपचारपद्धतीपेक्षा वेगळी असलेली निदान व उपचार पद्धती विकसित करण्यासंदर्भात अधिष्ठाता डॉ. निसवाडे यांनी प्रस्ताव सरकारला सादर केला. 
गॅमा कॅमेराच्या माध्यमातून कॅन्सर आहे की नाही, कॅन्सर झाल्यास देत असलेल्या ट्रीटमेंटला किती प्रतिसाद मिळतो आहे, नेमक्‍या किती पेशी बाधित आहेत, याचे सूक्ष्म निरीक्षण न्यूक्‍लिअर मेडिसीनमध्ये होणार होते. नेमक्‍या अवयवाला बाधा झाली असेल त्याचा किती भाग निकामी झाला आहे अथवा चांगला आहे तसेच देण्यात येणाऱ्या ट्रीटमेंटने किती प्रमाणात सुधारणा होत आहे या सर्व बाबी न्यूक्‍लिअर थेरपीच्या माध्यमातून जाणता येतात. राज्यात प्रथमच मेडिकलमध्ये ही निदान व उपचार विकसित करण्यासाठी सरकारतर्फे मोलाचे सहकार्य मिळत असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु, हे आता सारे हवेत विरल्याची चर्चा मेडिकलमध्ये रंगली आहे. 

पाच वर्षांत मेडिकल विकासाच्या हजार कोटींच्या घोषणांचा पाऊस पाडला गेला. मात्र, प्रत्यक्षात एकही घोषणा पूर्ण झाली नाही. विशेष असे की, फुप्फुस संस्थेपासून तर न्यूक्‍लिअर मेडिसीन विभाग तयार करण्याच्या घोषणा कागदावर आहेत. मात्र, रुग्णांना साधी रक्तदाब आणि मधुमेह नियंत्रणाची गोळी मिळत नाही. 
- अनिकेत कुत्तरमारे, समता सैनिक दल. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Daydream to be a Department of Nuclear Medicine Would be