ठिबक सिंचनाचा आदर्श धामना

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 जानेवारी 2017

डिलिव्हरिंग चेंज फोरमच्यावतीने भारतात २४ आणि २५ जानेवारीला मुंबईत आंतरराष्ट्रीय परिषद होत आहे. जगभरात उद्योग, प्रशासन, कला आणि तंत्रज्ञान क्षेत्रात नेत्रदीपक बदल घडविणाऱया 'चेंज मेकर्स'चा सहभाग हे परिषदेचे वैशिष्ट्य आहे. दोन दिवसांच्या परिषदेत विविध विषयांवर चर्चासत्रे, नेटवर्किंग आणि ज्ञानाची देवाण-घेवाण होणार आहे. परिषदेच्या पार्श्वभूमीवर 'सकाळ' समुह महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासासाठी पाठपुरावा करीत असलेल्या क्षेत्रांमध्ये नेमके काय घडते आहे, काय घडवावे लागेल याचा विभागनिहाय आढावा घेत आहोत.
डिलिव्हरिंग चेंज फोरम
२४ व २५ जानेवारी २०१७ 
नेहरू सेंटर, मुंबई
अधिक माहिती व सहभागासाठी क्लिक करा
www.deliveringchangeforum.com

उत्पादनात दुप्पट वाढ - १५० हेक्‍टरवर ठिबक सिंचन 

नागपूरपासून २० किलोमीटर अंतरावर असलेले धामना हे गाव शेतकऱ्यांसाठी आदर्श ठरत आहे. गावातील शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनावर सर्वाधिक भर दिल्याने त्यांना अल्पावधीतच दुप्पट उत्पादनासह पाण्याची बचत करणे शक्‍य झाले. याचे अनुकरण लगतच्या मोहगाव आणि शिरपूर येथील शेतकऱ्यांनी केले. 

धामना येथील मारोती थुतुरकर यांच्याकडे दोन एकर शेती आहे. यात ते कापूस, सोयाबीन आणि भाजीपाल्याची लागवड करायचे. विहिरीच्या पाण्यात त्यांना एकरी अडीच क्विंटल कापसाचे उत्पादन होत होते. लागवड खर्चाच्या तुलनेत कापूस विकल्यानंतर फारच कमी उत्पन्न हाती पडायचे. त्यावर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसाबसा चालत होता. कापसाचे पीक निघाल्यानंतर ते भाजीपाल्याची लागवड करीत होते. परंतु, त्याच्या विक्रीतून मिळणाऱ्या पैशात सर्व गोष्टींचे नियोजन करणे अवघड होत होते. 
त्यांना कृषी विभागाचे टोंगसे यांनी पंतप्रधान सूक्ष्म सिंचन योजनेतून ठिबकचे संच लावण्याचा सल्ला दिला. हे संच लावल्यानंतर उत्पादनात निश्‍चित फरक पडेल असे सांगितले. प्रारंभी मारोती यांनी याकडे दुर्लक्ष केले. मात्र टोंगसे यांनी आग्रह कायम ठेवत ठिबक संचासाठी ७५ टक्के अनुदान मिळत असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी ठिबक संच लावला. दुसऱ्याच वर्षी त्यांना दोन एकर शेतीत २५ क्विंटल कापसाचे उत्पादन झाले. कापसाला पाणी दिल्यानंतरही विहिरीला भरपूर पाणी शिल्लक राहिल्याने त्यांनी भाजीपाल्याची लागवड केली. 

धामना हे गाव शहरी भागालगत असल्याने भाजीपाला लागवडीसाठी कृषी विभागातर्फे हेक्‍टरी १२ हजार रुपये अनुदान दिले जाते. या योजनेचाही त्यांनी लाभ घेतला. ठिबकच्या मदतीने दोन एकर शेतीमध्ये कापसाचे २५ ते ३० क्विंटल उत्पादन व भाजीपाल्याचे पीक ते सध्या घेत आहेत. लागवड खर्च कमी झाला शिवाय ठिबकमुळे पाण्याची बचत होऊन उत्पन्नातदेखील वाढ झाली. त्यांचे बघून आदर्श धामना येथील देवानंद टोंगे, चंद्रभान टोंगे, अविनाश पारधी या शेतकऱ्यांनी ठिबकवर शेती करण्यास सुरुवात केली. ठिबक सिंचनाचे महत्त्व इतर शेतकऱ्यांना पटू लागल्याने मोहगाव
शिरपूर येथील शेतकऱ्यांनीसुद्धा ठिबकचे संच लावून घेतले. त्यामुळेच या भागातील १५० हेक्‍टर शेती ठिबकखाली आली. सरकारने ठिबक संचासाठी दिल्या जाणाऱ्या अनुदानात वाढ आणि जाचक अटी रद्द केल्यास शेतकऱ्यांना लाभ होऊ शकतो, असे मारोती थुतुरकर सांगतात. 

Web Title: ddrip irrigation in dhamana