अन्‌ विहिरीत आढळला कुजलेला मृतदेह

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 ऑक्टोबर 2019

अमरावती : मागील बारा तासांत शनिवारी (ता. 19) गाडगेनगर हद्दीत पांढरी हनुमान मंदिराजवळच्या विहिरीत एका अनोळखी व्यक्तीचा कुजलेला मृतदेह आढळला; तर, दोन वेगवेगळ्या घटनांत युवतीसह, युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली.

अमरावती : मागील बारा तासांत शनिवारी (ता. 19) गाडगेनगर हद्दीत पांढरी हनुमान मंदिराजवळच्या विहिरीत एका अनोळखी व्यक्तीचा कुजलेला मृतदेह आढळला; तर, दोन वेगवेगळ्या घटनांत युवतीसह, युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली.
गाडगेनगर हद्दीत पुरातन पांढरी हनुमान मंदिर आहे. मंदिर परिसरात एक विहीर आहे. त्यात शनिवारी (ता. 19) दुपारी बाराच्या सुमारास दुर्गंधी आल्यामुळे पोलिस नियंत्रण कक्षाला घटनेची माहिती देण्यात आली. गाडगेनगर पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने एका व्यक्तीचा (वय 32) मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. ही घटना दोन दिवसांपूर्वीची असल्याची शक्‍यता अधिकाऱ्यांनी वर्तविली. सावळा वर्ण, मजबूत बांधा, उंची अंदाजे 5 फूट 7 इंच, निळा शर्ट, काळ्या रंगाची पॅन्ट त्या व्यक्तीने परिधान केली आहे. गाडगेनगर पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद घेतली. सायंकाळपर्यंत मृत व्यक्तीची ओळख पटली नव्हती. जिल्ह्यातील बऱ्याच ठाण्याला घटनेची माहिती दिली.
गाडगेनगर परिसरातच भाड्याच्या घरात राहणाऱ्या माधुरी रमेश मेहरे (वय 21) युवतीने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. शनिवारी (ता. 19) सकाळी साडेअकराच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. गळफास घेतल्यानंतर ज्यावेळी तिला खाली उतरविले तेव्हा ती जिवंत असल्याने कुटुंबीयांनी तिला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले. तपासणीअंती डॉक्‍टरांनी माधुरीला मृत घोषित केले. तिच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही, असे पोलिस निरीक्षक मनीष ठाकरे यांनी सांगितले.
गळफास घेऊन आत्महत्येची दुसरी घटना शुक्रवारी (ता. 18) सायंकाळी उघडकीस आली. नया अकोला येथील सुमित दीपक बागडे (वय 19) या युवकाने स्वत:च्या घरात ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. वलगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद घेतली. दोघांच्याही आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dead body found in well