esakal | मृतदेह शोधून शोधून सापडेना, दोन दिवसांपासून नातेवाईक मारताहेत चकरा

बोलून बातमी शोधा

corona dead
मृतदेह शोधून शोधून सापडेना, दोन दिवसांपासून नातेवाईक मारताहेत चकरा
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : कोरोनाच्या संसर्गासोबतच मृत्यूच्या आकड्यात चिंताजनक वाढ झाली आहे. येथील वैद्यकीय महाविद्यालयातील सर्वच वॉर्ड हाउसफुल्ल झाले आहेत. रुग्णांना बेड उपलब्ध होत नाही. उपचारासाठी दाखल रुग्ण बेपत्ता झाल्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत. मात्र, आता, तर चक्क दोन दिवसांपासून नातेवाइकांना मृतदेहाचा शोध घ्यावा लागत आहे. डॉक्‍टर आणि पोलिसांकडे जाऊनही मृताचे नातेवाईक थकले आहेत.

हेही वाचा: 'ते' पाळतात माणुसकीचा धर्म! मुस्लिम तरुण रचतात चिता अन्‌ देतात भडाग्नीही; 923 मृतांवर अंत्यसंस्कार

नेर तालुक्‍यातील पिंपळगाव (काळे) येथील 26 वर्षीय तरुणाची प्रकृती अचानक बिघडल्याने त्याला वैद्यकीय महाविद्यालयात मंगळवारी (ता. 20) भरती करण्यात आले होते. फिव्हर ओपीडीत तपासणी केल्यावर त्याला अपघात विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्या ठिकाणी तरुणाने सायंकाळी साडेसात वाजता अखेरचा श्‍वास घेतला. मात्र, त्याची माहिती नातेवाइकांना न देता उपचाराच्या नावाखाली मृतदेह सारीच्या वॉर्डात हलविण्यात आला. अखेर रात्री साडेदहा वाजता तरुणाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. बुधवारी (ता.21) सकाळी कोरोनाचा अहवाल आल्यावर अंत्यसंस्कार करता येणार असल्याची माहिती देत नातेवाइकांनी घरी जाण्याचा सल्ला देण्यात आला. नातेवाइकांनी बुधवारी सकाळी येथील शवविच्छेदन गृह मृतदेह ताब्यात घेण्यासाठी गाठले. मात्र, मृतदेह अजून आलाच नाही, असे सांगण्यात आले. पुन्हा नातेवाइकांनी वॉर्डात जाऊन विचारणा केली असता, शवविच्छेदन गृहात पाठविण्यात आल्याची माहिती दिली. नातेवाइकांनी परत खात्री केली. सायंकाळी कोणताही तोडगा न निघाल्याने यवतमाळ पोलिस ठाणे गाठले. मात्र, पोलिसांनी एक दिवस थांबा, मृतदेह मिळेल, असा सल्ला दिल्याने नातेवाईक माघारी परतले. गुरुवारी (ता. 22) नातेवाइकांनी तोच कित्ता गिरविला. अखेर शवविच्छेदन गृहातील सर्व मृतदेह नातेवाइकांना दाखविण्यात आले. तरीदेखील तरुणाचा मृतदेह मिळू शकला नाही. कुटुंबाचा आधार असलेल्या तरुणाच्या मृत्यूमुळे कुटुंबीय खचून गेले आहे. आपल्या प्रिय व्यक्तीचा अखेरचा चेहरा बघता यावा, म्हणून पोलिसांत तक्रार देण्याचा निर्णय घेण्यात आला. सायंकाळपर्यंत पोलिसांत तक्रार देण्यात आली नव्हती.

सदर तरुणाचे नातेवाईक मृतदेहाचा शोध घेत असल्याची माहिती मिळाली आहे. त्यानुसार आम्ही चौकशी सुरू केली आहे.
-डॉ. मिलिंद कांबळे, अधिष्ठाता, वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ.