धक्कादायक! वाळू तस्कर निर्ढावले; चक्क तहसीलदारांच्या अंगावर चढविला ट्रॅक्टर, या जिल्ह्यातील दुसरी घटना

sand mafia's tractor in washim.jpg
sand mafia's tractor in washim.jpg

रिसोड (जि.वाशीम) : अवैधपणे वाळूचा उपसाकरून विक्री करणार्‍यांवर रिसोड तालुक्यात धडक कारवाई केली जात आहे. त्यामुळे चिडून एका वाळूतस्कराने रिसोड तालुक्यातील गोभणी घाटावर तहसीलदार अजित शेलायांच्यावर शुक्रवारी (ता.22) च्या रात्री सव्वाअकरा वाजता ट्रॅक्टर अंगावर नेऊन जीवघेणा हल्ला केला.

या हल्ल्यामध्ये तहसीलदार शेलार थोडक्यात बचावले आहेत. या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी कारंजा तालुक्यात तहसीलदारावर अशाच प्रकारचा हल्ला झाला होता. वाळू माफीयांना कायद्याचा धाकच न राहिल्याने ते निर्ढावले आहेत. अशा तस्करांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

रिसोड तालुक्यातून वाहत असलेल्या पैनगंगा नदी पात्रातील विविध घाटावरून रेतीचा अवैध उपसा होत असल्याची चर्चा तालुक्यात धुमाकूळ घालत आहे. यावर आळा घालण्यासाठी रिसोड महसूल प्रशासनाने कंबर कसली आहे. यापूर्वीही अवैध रेती तस्करांकडून लाखो रुपये दंड वसूल केलेला आहे. मात्र तरीही रेतीचा उपसा काही थांबेना. याच अनुषंगाने तहसीलदारांनी तालुक्यातील विविध रेती घाटावर धाड टाकण्याचे सत्र सुरू केले व रेती तस्करांमध्ये एकच खळबळ उडाली. 

दरम्यान शुक्रवारी (ता. 22) रोजी रात्री सव्वाअकरा वाजताच्यादरम्यान रिसोड तालुक्यातील गोभणी घाटावर तहसीलदार अजित शेलार यांनी आपले सहकारी रिसोड भाग 1 चे तलाठी स्वप्नील धांडे व इतर कर्मचार्‍यांच्या समवेत धाड टाकली. तहसीलदार येत असल्याचे बघताच तेथील ट्रॅक्टर धारकांनी पळ काढला यात एका ट्रॅक्टरचा पाठलाग करून त्यास घाटाच्या काही दोन ते तीन किलोमीटर अंतरावर पकडण्यात आले. तेथे ट्रॅक्टर चालक संतोष अशोक कुर्‍हे (रा. नेतंसा ) याला पकडून ट्रॅक्टरसह रिसोड पोलिस स्टेशनला येण्यास सांगितले असता तेथे तहसीलदार अजित शेलार व रेती तस्कर ट्रॅक्टर चालक यांच्यामध्ये वाद झाला व त्याने तेथे ट्रॅक्टर तहसीलदारांवर चढविण्याचा प्रयत्न केला. 

तहसीलदार शेलार यांना हातावर पाठीवर मार लागला. आरोपीस पकडून रिसोड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. यादरम्यान आरोपी ट्रॅक्टर चालकाने तहसीलदार व अन्य कर्मचार्‍यांना धक्काबुक्की सुद्धा केली आहे. स्वप्नील धांडे यांच्या फिर्यादीवरून रिसोड पोलीस स्टेशनमध्ये आरोपी विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.

सिनेस्टाइलने केला पाठलाग
महसूल कर्मचारी हे रेती घाटावर आल्याचे कळताच सदर ट्रॅक्टर चालकाने तेथून पळ काढला हे बघताच तहसीलदार शेलार यांनी आपल्या वाहनचालकाला त्याचा पाठलाग करण्यास सांगितले. ट्रॅक्टरचालक अक्षरशः सुसाट वेगाने पळत होता व त्याने पळून जाण्याचा आटोकाट प्रयत्न केला. यादरम्यान त्याने ट्रॅक्टरमध्ये असलेली रेती एका ठिकाणी रिकामी सुद्धा केली व पुन्हा पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र तो यशस्वी झाला नाही. कर्मचार्‍यांना त्याला पकडण्यात यश आले.

दररोज हजारो ब्रास रेतीची चोरी
हजारो ब्रास रेती चोरून महसूल प्रशासनाला दैनंदिन लाख रुपये महसूलचा जुना लागत होता. रिसोड तालुक्यातील गोभणी, मसला पेन, किनखेडा, धोडप, सरपखेड आदी रेती घाटावरून दररोज शेकडो ट्रॅक्टर अवैध रेती उपसा होत असल्याने यावर आळा घालण्यासाठी तहसीलदार शेलार यांनी विविध पथकाची नेमणूक केलेली आहे. याच अनुषंगाने ही कारवाई केली जात होती

रेती तस्करांना आळा घालण्यात येईल
रिसोड तालुक्यातून रेतीचा अवैध उपसा होत आहे. परिणामी शासनाचा लाखो रूपयांचा महसूल डुबत आहे. रेतीची वैध वाहतूक होत असल्याच्या अनेक तक्रारी महसूल विभागाला मिळत असल्याने सदर कारवाई सुरू आहे. त्यासाठी विविध पथके गठित करण्यात आली आहेत. अशा प्रकारची कारवाई पुढे सुद्धा सुरूच राहणार असून रेती तस्करांना आळा घालण्यात येईल.
- अजित शेलार, तहसीलदार, रिसोड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com