मृत जनावरांच्या विल्हेवाटीचा मार्ग मोकळा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 जून 2018

नागपूर - मृत जनावरे पुरण्याऐवजी तांत्रिक पद्धतीने विल्हेवाटीचा मार्ग आज मोकळा झाला. स्थायी समितीने इन्सिनरेटर खरेदीसाठी निविदा प्रक्रिया करण्यासंबंधीच्या  प्रस्तावाला हिरवी झेंडी दाखविली. भांडेवाडीत अठराशे वर्ग मीटर जागेत हा प्रकल्प उभारला  जाणार आहे. 

नागपूर - मृत जनावरे पुरण्याऐवजी तांत्रिक पद्धतीने विल्हेवाटीचा मार्ग आज मोकळा झाला. स्थायी समितीने इन्सिनरेटर खरेदीसाठी निविदा प्रक्रिया करण्यासंबंधीच्या  प्रस्तावाला हिरवी झेंडी दाखविली. भांडेवाडीत अठराशे वर्ग मीटर जागेत हा प्रकल्प उभारला  जाणार आहे. 

गेल्या अनेक वर्षांपासून भांडेवाडी परिसरात मृत जनावरे पुरली जाताहेत. मृत जनावरांच्या तोंडातून निघणारा स्त्राव, अपघातात मृत पावलेल्या जनावरांचे रक्त थेट जमिनीत मुरत असल्याने  भूगर्भातील पाणी दूषित होत असल्याकडे ‘सकाळ’ने ‘मृत जनावरांमुळे भूगर्भ दूषित’ या मथळ्यासह ठळकपणे वृत्त प्रकाशित करीत लक्ष वेधले होते. या वृत्तांची दखल घेत आरोग्य विभागाने मृत जनावरे तांत्रिक पद्धतीने जाळण्यासाठी आवश्‍यक इन्सिनरेटर खरेदीसंदर्भातील  प्रस्ताव तयार करून स्थायी समितीकडे मंजुरीसाठी पाठविला. स्थायी समितीची बैठक आज महापालिकेत पार पडली. यावेळी स्थायी समिती अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांनी प्रस्ताव मंजूर केला. साडेतीन कोटी रुपयांचा हा प्रकल्प भांडेवाडीतील कत्तलखान्यासाठी आरक्षित जागेवर उभारण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत महापालिकेला घनकचरा व्यवस्थापनासह स्वच्छतेसाठी २८८ कोटींचा विकास आराखडा तयार केला आहे.

केंद्र व राज्य सरकारकडून मिळणाऱ्या स्वच्छतेच्या निधीतून या प्रकल्पासाठी खर्च केला जाणार आहे. इन्सिनरेटरच्या खरेदीसाठी निविदा प्रक्रिया करण्याचे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांनी दिले.

याच वर्षात इन्सिनेरेटरची उभारणी केली जाईल. स्थायी समितीने इन्सिनरेटर खरेदीसंदर्भातील निविदा प्रक्रियेला हिरवी झेंडी दिली आहे. 
- वीरेंद्र कुकरेजा, अध्यक्ष, स्थायी समिती, महापालिका

Web Title: death animal Disposal