गोठ्याला लागलेल्या आगीत जनावरांचा होरपळून मृत्यू 

अनिल दंदी
सोमवार, 11 फेब्रुवारी 2019

काळजाचा थरकाप उडवणाऱ्या या घटनेत गोठ्यातील दोन बैल, एक वासरू व एक गाय अशी चार जनावरे जळून मृत्युमुखी पडली.

बाळापूर (अकोला) - तालुक्यातील देगाव येथे जनावरांच्या गोठ्याला आग लागून चार जनावरे मृत्युमुखी पडल्याची घटना घडली. येथील शेतकरी गोपाल माणिकराव शेगोकार यांच्या गोठ्याला ही आग लागली. शेगोकार यांचे सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान या घटनेत झाले. अज्ञात व्यक्तीने हि आग लावल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, देगाव येथील गोपाल शेगोकार यांचा गावालगत गुरांचा गोठा आहे. गोठ्यास रविवारी मध्यरात्रीनंतर हि आग लागली. काळजाचा थरकाप उडवणाऱ्या या घटनेत गोठ्यातील दोन बैल, एक वासरू व एक गाय अशी चार जनावरे जळून मृत्युमुखी पडली.

या आगीत शेती उपयोगी साहित्य, जनावरांचा चारा, टिनपत्रे, सरपन व ईतर उपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. रात्री एका घराचे बांधकाम सुरू असताना त्यावरील मजुरांना गुरांच्या हंबरण्याचा आवाज आला. मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर धुराचे लोट निघत असल्याने त्यांनी तिकडे धाव घेतली. मात्र तोपर्यंत सर्वच जळून खाक झाले होते. 

कितीतरी वेळ हा गोठा जळत राहीला. खुंट्याला बांधलेले असल्याने जनावरांना जागचे हलताही आले नाही. शेगोकार यांच्याकडे चार एकर शेती असून त्यावरच चरितार्थ चालतो. एक लाख रुपये किमतीची ही बैलजोडी होती. 

Web Title: Death of an animals in a gross fire

टॅग्स