जामठा स्टेडियमवरील बंदोबस्तातील सहायक फौजदाराचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
12.42 AM

नागपूर : जामठा येथे भारत आणि बांगलादेशदरम्यान झालेल्या क्रिकेट सामन्याच्या बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या सहायक पोलिस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्‍याने मृत्यू झाला. मदार शेख असे मृत सहायक फौजदाराचे नाव असून ते शहर पोलिस मुख्यालयात कार्यरत होते.

नागपूर : जामठा येथे भारत आणि बांगलादेशदरम्यान झालेल्या क्रिकेट सामन्याच्या बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या सहायक पोलिस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्‍याने मृत्यू झाला. मदार शेख असे मृत सहायक फौजदाराचे नाव असून ते शहर पोलिस मुख्यालयात कार्यरत होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत-बांगलादेशदरम्यान रविवारी जामठा येथे एकदिवसीय क्रिकेट सामना होता. यासाठी शहर पोलिसांचा बंदोबस्त लावला होता. त्यामुळे पोलिस शिपायांना जामठा येथे सकाळीच बंदोबस्तासाठी बोलावले होते. सहायक फौजदार मदार शेख हेदेखील आपल्या सहकाऱ्यांसह वाठोडा येथे बंदोबस्तासाठी गेले होते.
दुपारी बारा वाजताच्या सुमारास वरिष्ठ पोलिस अधिकारी हे शिपायांचा बंदोबस्त लावत होते. त्यावेळी मदार शेख हे स्टेडियमच्या जवळच असलेल्या पोलिस पेंडालमध्ये खुर्चीवर बसले होते. दुपारी 12.05 च्या सुमारास अचानक त्यांना चक्कर येऊन ते खाली पडले. लगेच त्यांना जामठा येथील शुअरटेक हॉस्पिटल येथे नेण्यात आले. डॉक्‍टर त्यांच्यावर उपचार करीत असतानाच त्यांचा जीव गेला. याप्रकरणी हिंगणा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. मृत पोलिस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना पोलिस विभागासह व्हीसीएकडून आर्थिक मदत मिळावी, अशी भावना पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये आहे.

कामाचा ताण असह्य
पोलिस विभागाने सर्वच प्रकारच्या सुट्या रद्द केल्या आहेत. त्यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांना विविध बंदोबस्तासाठी तैनात केले जात आहे. या वाढलेल्या कामाच्या ताणामुळे आरोग्याकडे पोलिस कर्मचारी दुर्लक्ष करतात. त्यातूनच मोठ्या आजारांना आमंत्रण मिळते. त्यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांना किमान हक्‍काच्या सुट्यांवर गदा आणू नये, असा सूर पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Death of auxiliary soldier in a settlement at Jamtha Stadium