एम्प्रेस मॉलमध्ये मृतदेह ठेवून आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 एप्रिल 2018

नागपूर - एम्प्रेस सिटी मॉलच्या प्रवेशद्वाराजवळील विहिरीत मृत्यू झालेल्या तीनही मजुरांचे मृतदेह आज रविवारी दुपारी चार वाजता मॉलमध्ये ठेवून आंदोलन करण्यात आले. मृत मजुरांच्या नातेवाइकांनी एम्प्रेस सिटीमध्ये नोकरी आणि प्रत्येकी २५ लाखांची आर्थिक मदत देण्याची मागणी केली. मात्र, मालक हजर नसल्यामुळे व्यवस्थापकाने केवळ आश्‍वासन देण्यावर भर दिल्यामुळे प्रकरण चिघळले. पोलिसांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त असल्याने कोणतीही अनुचित घटना घडली नाही.

नागपूर - एम्प्रेस सिटी मॉलच्या प्रवेशद्वाराजवळील विहिरीत मृत्यू झालेल्या तीनही मजुरांचे मृतदेह आज रविवारी दुपारी चार वाजता मॉलमध्ये ठेवून आंदोलन करण्यात आले. मृत मजुरांच्या नातेवाइकांनी एम्प्रेस सिटीमध्ये नोकरी आणि प्रत्येकी २५ लाखांची आर्थिक मदत देण्याची मागणी केली. मात्र, मालक हजर नसल्यामुळे व्यवस्थापकाने केवळ आश्‍वासन देण्यावर भर दिल्यामुळे प्रकरण चिघळले. पोलिसांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त असल्याने कोणतीही अनुचित घटना घडली नाही.

गांधीसागर तलावाजवळील एम्प्रेस सिटी मॉलमधील बेसमेंटमध्ये असलेल्या विहिरीतील मोटर काढण्यासाठी प्लंबर दीपक महादेवराव गवते (वय ४५, रा. सुगतनगर, पॉवर ग्रीड चौक) हे विहिरीत उतरले होते. त्यांचा श्‍वास कोंडल्याने ते बेशुद्ध पडले. त्यांना वाचविण्यासाठी अजय मारोती गारोडी (वय ४५, लाडपुरा, तांडाचौक) आणि चंद्रशेखर जागोबाजी बारापात्रे (वय ४३, नाईक तलाव, बांगलादेश) हे दोघे विहिरीत उतरले. तिघेही गुदमरून बेशुद्ध पडले. त्यांना तातडीने मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्‍टरांनी तपासून मृत घोषित केले.

 या प्रकरणी गणेशपेठ पोलिसांनी मॉलचे मालक प्रवीण तयाल याच्यासोबत एकूण पाच जणांविरुद्ध गुन्हा  दाखल केला. 

आज दुपारी बारा वाजतापासून मेडिकल रुग्णालयात तीनही मृतदेहाचे शवविच्छेदनाची प्रक्रिया सुरू होती. काही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तीनही मजुरांच्या नातेवाइकांना मोठी आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्‍वासन दिले. मृतदेहावर अंत्यसंस्कार न करता थेट एम्प्रेस सिटी मॉलमध्ये तीनही मृतदेह आणण्यात आले. रविवारी खरेदीसाठी चिक्‍कार गर्दी असलेल्या एम्प्रेस मॉलमध्ये प्रवेशद्वाराजवळ मृतदेह ठेवल्यामुळे आणखी गर्दी वाढली. जोपर्यंत मृतांच्या नातेवाइकांना २५ लाख रुपये आणि नोकरी देण्याचे लेखी आश्‍वासन मिळत नाही, तोपर्यंत मृतदेह उचलणार नाही, अशी भूमिका नातेवाइकांनी घेतली होती. या प्रकारामुळे वातावरणही तापले होते. 

पोलिस यंत्रणा सपशेल अपयशी
तीनही मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर थेट एम्प्रेस मॉलमध्ये मृतदेह ठेवण्याची तयारी नातेवाईक आणि राजकीय कार्यकर्त्यांनी केली होती. मात्र, या बाबतीत गणेशपेठ पोलिसांना कानोकान खबर नव्हती. मृतदेह मॉलमध्ये ठेवल्यानंतर काही वेळाने पोलिस तेथे पोहोचले. त्यामुळे पोलिसांची यंत्रणा सपशेल अपयशी ठरली. 

सहा जणांवर गुन्हे दाखल 
विहिरीत उतरण्यासाठी मजूर पाठवताना योग्य ती खबरदारी न घेतल्यामुळे तीन मजुरांचा नाहक  बळी गेला. त्यामुळे मजुरांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या एम्प्रेस मॉलचा मालक प्रवीण तयाल आणि व्यवस्थापक प्रदीप भवते, व्यवस्थापक समीर भूमिराज टाकोने (वय ३७, रा. गणेशपेठ), खुशबू अग्रवाल आणि कोमल रायजोडे यांच्याविरूद्ध गुन्हे दाखल केले.

भारतीय महिला क्रिकेट संघाचा हिरमोड
भारत आणि इंग्लंड संघादरम्यान एकदिवसीय क्रिकेट मालिका सुरू आहे. त्यासाठी भारतीय  महिला क्रिकेट संघ नागपुरात आहे. रविवारी सायंकाळच्या सुमारास सराव केल्यानंतर बागी-२ हा चित्रपट पाहण्यासाठी एम्प्रेस मॉलमध्ये खेळाडू आले होते. मात्र, या ठिकाणी असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे भारतीय संघाच्या खेळाडूंना आल्यापावली परतावे लागले. भारतीय संघ १२ एप्रिलपर्यंत नागपुरात असल्यामुळे पुन्हा चित्रपट बघण्यासाठी येण्याची शक्‍यता आहे. 

रात्री उशिरा हलवले मृतदेह 
दुपारी चार वाजतापासून मजुरांचे मृतदेह एम्प्रेस मॉलमध्ये ठेवण्यात आले होते. रात्री ११ वाजतापर्यंत मृतदेह मॉलमध्येच होते. तत्पूर्वी, भाजपचे आमदार विकास कुंभारे यांनी मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ लाख आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निधीतून २ लाख रुपये मिळवून देण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र, तरीही नातेवाइकांनी मृतदेह उचलण्यास नकार दिला होता. रात्री अकरा वाजता पोलिसांनी नातेवाइकांची समजूत घातली. त्यानंतर तीनही मृतदेह अंत्यसंस्कारासाठी रवाना करण्यात आले.

कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून मॉल बंद
रविवारी मॉलमध्ये खूप गर्दी असते. मात्र, आज दुपारपासून मृतदेह ठेवण्यात आल्याने अनेकांनी खरेदी सोडून मृतदेहाजवळच गर्दी केली होती. औत्सुक्‍याने प्रत्येक जण ‘क्‍या हुवा हैं’ अशी विचारपूस करीत होते. सायंकाळच्या सुमारास कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून मॉल बंद करण्यात आला. त्यामुळे अनेकांचा खरेदीचा आनंद हिरावला तर ग्राहकांचे चेहरे उतरले होते.

मॉलला छावणीचे स्वरूप
मृतदेह ठेवून आंदोलन सुरू होताच पोलिस उपायुक्‍त राहुल माकणीकर आणि एसीपी राजरत्न बन्सोड यांनी पोलिसांची कुमक बोलावली. क्‍यूआरटीसह जवळपास १५० पोलिसांचा ताफा मॉलच्या प्रवेशद्वाराजवळ तैनात होता. काही राजकीय कार्यकर्ते परिस्थिती चिघळविण्याचा प्रयत्न करीत होते. त्यामुळे सायंकाळपर्यंत आणखी बंदोबस्त वाढविण्यात आला होता.

Web Title: death body empress mall agitation