जिल्हा कचेरीत विष घेणाऱ्याचा मृत्यू

file photo
file photo

अमरावती ः जिल्हाधिकाऱ्याच्या दालनाबाहेर विषारी औषध पिणाऱ्या अनिल साहेबराव चौधरी (वय 45 रा. लोहगाव) यांचा शुक्रवारी (ता. 14) सकाळी सव्वानऊच्या सुमारास मृत्यू झाला. या घटनेनंतर नातेवाइक व ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासनाकडून मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीची मागणी केली. त्यामुळे शवविच्छेदन प्रक्रियेस विलंब झाला. अनिल चौधरी, असे आत्महत्या करणाऱ्या ग्रामस्थाचे नाव आहे.
शासनाने गावतलावासाठी काही वर्षांपूर्वी शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहीत केली होती. त्याचा मोबदला त्यांना शासनाने दिला. त्यापैकी चौधरी यांच्यासह अन्य काही शेतकऱ्यांनी त्यानंतर वाढीव मोबदल्यासाठी न्यायालयात धाव घेतली. ते प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे.
4 जून 2019 रोजी जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीच्या सभेत तलाव उत्खननासाठी परवानगी प्राप्त झाली. त्यासाठी आवश्‍यक असलेले नाहरकत प्रमाणपत्रही देण्यात आले होते. उत्खननातील गौणखनिज हे समृद्धी महामार्गाच्या कामासाठी वापरले जाणार होते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या आदेशावरून यंत्रणेने उत्खननासाठीची यंत्रसामग्री लोहगाव तलावपात्रात दोन दिवसांपूर्वीच आणली. त्याला त्याच दिवशी अनिल चौधरी यांच्यासह अन्य काही लोकांनी विरोध केला. त्यापूर्वीच 3 जून 2019 रोजी अनिल चौधरी, छगन किसन सानप, गुलाबराव विश्‍वनाथ इंगळे, रामकृष्ण वामन सानप या चौघांनी जिल्हाधिकारी कार्यालयात माहितीच्या अधिकारात एक अर्ज सादर केला. त्यात तलावाच्या जागेचे पुन्हा मोजमाप करावे, जी जमीन तलावाच्या खोदकामासाठी वापरली जाईल ती वापरावी, उर्वरित जमीन आम्हाला परत करावी. ती जागा जनावरे चराईसाठी कायम ठेवावी. अन्यथा अचानक आत्मदहन करू, असा इशारा दिला होता. त्यानुसार अनिल चौधरी यांनी गुरुवारी (ता. 13) जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन विष घेतले.
प्रशासनाकडे आर्थिक मदतीची मागणी
अनिल चौधरी यांची कौटुंबिक परिस्थिती डोळ्यापुढे ठेवून, त्याच्या कुटुंबीयांना शासनाकडून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आवश्‍यक ती कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले, असे श्री. चौधरी यांचे चुलतभाऊ व निवृत्त पोलिस उपअधीक्षक पुरुषोत्तम चौधरी यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com