अंत्री मलकापूर येथे विद्यार्थ्याचा डेंगीच्या आजाराने मृत्यू

अनिल दंदी
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

बाळापूर तालुक्यात मागील आठ दिवसांपासून डेंग्यूची साथ सुरू असून, अंत्री मलकापूर येथील नववीच्या विद्यार्थ्याचा डेंगीच्या आजाराने उपचारापूर्वीच मृत्यू झाला आहे. उरळ येथील शिवशंकर विद्यालयाचा हा इयत्ता नववीचा विद्यार्थी होता. तर आणखी गावातील इतरांना तापाची लागण झाली असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
 

अकोला: बाळापूर तालुक्यात मागील आठ दिवसांपासून डेंग्यूची साथ सुरू असून, अंत्री मलकापूर येथील नववीच्या विद्यार्थ्याचा डेंगीच्या आजाराने उपचारापूर्वीच मृत्यू झाला आहे. उरळ येथील शिवशंकर विद्यालयाचा हा इयत्ता नववीचा विद्यार्थी होता. तर आणखी गावातील इतरांना तापाची लागण झाली असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

परंतु, उरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी कर्मचारीच नसल्याचं समोर आले आहे. तालुक्यातील अंत्री मलकापूर येथील अभिषेक गजानन बोराखडे हा उरळ येथील शिवशंकर विद्यालयात शिक्षण घेत होता. काल मंगळवारी अभिषेक यास अचानक ताप आल्याने त्याला उपचारासाठी रूग्णालयात नेत असताना त्याचा मृत्यू झाला.

अभिषेकच्या अचानक जाण्याने त्याच्या पालकावर मोठा आघात झाला आहे. डोळ्यात अश्रू असलेल्या अभिषेकच्या वडिलांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, अभिषेकला अचानक ताप आला आम्ही त्याला मंगळवारी सायंकाळी प्रथम उरळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखवले. मात्र आरोग्य केंद्रात कोणीच राहत नसल्याचे ते म्हणाले. प्राथमिक केंद्रात कोणी राहिले असते तर कदाचित अभिषेकचे प्राण वाचले असते.अकोला येथील खासगी रुग्णालयात दाखल केल्यावर पालकांनी मुलाच्या रक्ताची तपासणी केली असता, त्याला डेंग्यूचा ताप असल्याचे निष्पन्न झाले.

प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरांची वाणवा
बाळापूर तालुक्यातील अंत्री मलकापूर येथे तापाची साथ सूरु असून याकडे आरोग्य यंत्रणेचे लक्ष नाही. उरळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे व  डॉक्टरांचे निवास स्थान ओस पडले आहे. वास्तविक कर्मचार्‍यांना मुख्यालय सोडून कुठेही जाता येत नाही. एकीकडे तापाच्या साथीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वेग वेगळ्या उपाययोजना करत असल्याचे सांगून वैद्यकीय पथक रुग्णावर उपचार करत असल्याचे अधिकारी सांगत आहे तर दुसरीकडे मात्र प्राथमिक केंद्रात कोणीच राहत नसल्याचे आढळून आले.

वैद्यकीय कर्मचारी आणि अधिकार्‍यांच्या गलथान कारभारामुळे एका चिमुकल्याला आपला जीव गमवावा लागल्यानंतर ही इतरांचे उपचार करण्यासाठी कोणीही उपस्थित नाही ही एक शोकांतिकच म्हणावी लागेल. वेदनारहित झालेल्या आरोग्य विभागाला जाग तरी कधी येणार असा प्रश्न आता उपस्थित झाला. 

या घटनेबाबत मी अनभिज्ञ असून मुलाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला ते निश्चित सांगता येणार नाही. मात्र गावात आरोग्य यंत्रणा सजग करण्यात येणार आहे, असे बाळापूरच्या वैद्यकीय अधिकारी, डॉ. भावना हाडोळे यांनी सांगितले आहे.

Web Title: Death of a student due to Dengue