वाघिणीसह दोन बछड्यांचा मृत्यू

शंकरपूर ः मेटेपार गावालगत मृतावस्थेत आढळून आलेल्या वाघिणीसह बछडे.
शंकरपूर ः मेटेपार गावालगत मृतावस्थेत आढळून आलेल्या वाघिणीसह बछडे.

शंकरपूर (चिमूर) (जि. चंद्रपूर) : चिमूर तालुक्‍यातील मेटेपार गावालगतच्या नाल्याजवळ एका वाघिणीसह दोन बछड्यांचे मृतदेह सोमवारी (ता. 8) सकाळी साडेसातच्या सुमारास आढळल्याने वनविभागात खळबळ उडाली आहे. या तिघांचाही मृत्यू विषप्रयोगाने झाला, असा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणात एका शेतकऱ्याला वनविभागाने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, या घटनेच्या चौकशीचे आदेश राज्याचे अर्थ, वन आणि चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत. मागील तीन महिन्यांत जिल्ह्यात पाच वाघांचा मृत्यू झाला.
घटनास्थळ शंकरपूर वनपरिक्षेत्रात येते. मेटेपार नाल्याजवळ वाघीण आणि तिचे बछडे मृतावस्थेत आढळले. त्याला लागूनच शेत आहे. त्या शेतातील जांभळाच्या झाडांचा सौदा करण्यासाठी काही शेतकरी सकाळी त्या परिसरात गेले होते. तेव्हा त्यांच्या निदर्शनास ही घटना आली. या तीन मृतदेहांव्यतिरिक्त तिथेच एक वासरू मृतावस्थेत आढळले. त्याचे दोन्ही पाय तुटलेले होते. वाघीण आणि तिच्या बछड्यांनी ते वासरू खाल्ल्यामुळे त्यांना विषबाधा झाली असावी, अशी शक्‍यता आता वर्तविली जात आहे. मेटेपार येथील पांडुरंग कानबा चौधरी यांच्याकडील वासराला गावातील कुत्र्यांनी ठार मारले. त्या कुत्र्यांना मारण्यासाठी मृत वासरावर "थिमेट' टाकून शेतातील आंब्याच्या झाडाखाली ठेवले होते, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. रात्रीला वाघीण आणि तिचे बछडे शिकारीच्या शोधात आले. तेव्हा त्यांना वासरू दिसले. वाघिणीने मृत वासराला नाला ओलांडून फरपटत लक्ष्मण सावसाकडे यांच्या शेतातलगतच्या झुडपात आणून खाल्ले. तिघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण समोर येईल.
वाघीण चार वर्षांची तर बछडे आठ ते नऊ महिन्यांचे आहे, अशी माहिती वनविभागाने दिली. माहिती मिळताच घटनास्थळाला मुख्य वनसंरक्षक रामाराव, पशुवैद्यकीय अधिकारी रवी खोब्रागडे, ब्रह्मपुरीचे उपवनसंरक्षक कुलराज सिंग यांनी आपल्या सहकाऱ्यांसह भेट दिली. रात्री उशिरापर्यंत शवविच्छेदनाची प्रक्रिया सुरू होती. वाघीण आणि तिच्या बछड्यांच्या मृत्यूची माहिती पसरताच परिसरातील लोकांनी मोठ्या संख्येत घटनास्थळी गर्दी केली. गर्दीला आटोक्‍यात आणण्यासाठी वनविभागाला पोलिसांना पाचारण करावे लागले. एप्रिल-2019 मध्ये ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघाच्या शिकारीचे प्रकरण समोर आले. 26 जून 2019 ला सावली तालुक्‍यात वाघाचा बछडा मृतावस्थेत आढळला. सोमवारी वाघिणीसह दोन बछड्यांच्या मृत्यूची घटना समोर आली.

वनमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
या प्रकरणी घातपात किंवा शिकार झाली असल्यास सक्षम यंत्रणेद्वारे तपास करावा. दोषींवर कडक कारवाई करावी तसेच अशा पद्धतीच्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यादृष्टीने आवश्‍यक खबरदारी आणि उपाययोजना करण्याचे निर्देश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांना दिले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com