कीटकनाशकबाधितांचे मृत्यूही बेदखल

file photo
file photo

यवतमाळ : विदर्भात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. तसेच, कीटकनाशक विषबाधेचे प्रमाणही वाढत आहे. जणूकाही शेतकऱ्यांचे मरण स्वस्त झाले की काय, अशी स्थिती आहे. शेतकरी आत्महत्या पात्र ठरताना दिसत नाहीत व कीटकनाशक विषबाधेचे मृत्यूदेखील बेदखल होताना दिसत आहेत. आत्महत्यांचे प्रमाण घटले आणि विषबाधा शून्यावर आल्याचे शासकीय यंत्रणा दाखविण्याचा प्रयत्न तर करीत नाही ना, असा संभ्रम निर्माण झाला आहे.
गेल्या दोन वर्षांपूर्वी विदर्भात कीटकनाशक विषबाधेने शेतकरी, शेतमजुरांचे मृत्यू होत असल्याचे "सकाळ'ने सर्वप्रथम उघडकीस आणले होते. सरकारने या घटनेची दखल गांभीर्याने घेतली होती. विषबाधा होऊ नये, म्हणून विविध पातळ्यांवर उपाय केले गेले. यात सरकारला यशही आले. गेल्या वर्षी यवतमाळ जिल्ह्यात एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही, हे विशेष. यावर्षी आतापर्यंत वऱ्हाडात तीन व पश्‍चिम विदर्भात दोन अशा पाच शेतकरी, शेतमजुरांचे मृत्यू विषबाधेने झाले आहेत.
मंत्रिमडळ बैठकीसमोर सादर केलेल्या अहवालानुसार पश्‍चिम विदर्भात एकाचाही मृत्यू हा कीटकनाशकांच्या विषबाधेने झालेला नाही. प्रत्यक्ष ज्या पाच बाधितांचे मृत्यू झाले त्यांच्यावर रुग्णालयात "कॉन्टॅक्‍ट पॉयझन' या सबबीखालीच उपचार झाल्याची माहिती आहे. विषबाधिताला भरती करताना "फवारणीदरम्यान विषबाधा' झाल्याची नोंद घेतल्यावर रुग्णांच्या नातेवाइकांकडून "रुग्णाने विषारी द्रव्य प्राशन केल्याचे' लेखी लिहून घेतले जात आहे. त्यामुळे शासनाच्या भूमिकेवर संशय निर्माण होत आहे. यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 3 सप्टेंबर रोजी वसंत मानसिंग राठोड (रा. दत्तापूर, ता. घाटंजी) यांना फवारणीदरम्यान विषबाधा झाल्याने रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यांच्या केसपेपरवर "स्प्रेईंग ऑफ इनसेक्‍टिसाइट'ची नोंद करण्यात आली. मात्र, नातेवाइकांकडून डॉक्‍टरांनी रुग्णाने विष प्याल्याचे व त्यानुसार उपचार करण्यास हरकत नसल्याचे हमीपत्रच लिहून घेतले. विष प्याल्याचे का लिहून घेतले जात आहे, असा प्रश्‍न यानिमित्ताने रुग्णांचे नातेवाईक विचारत आहेत. शासन विषबाधितांचे मृत्यू लपविण्यासाठी तर ही खेळी करत नाही ना, असा संशयही व्यक्त केला जात आहे.

``रुग्णालयात दाखल रुग्णाने फवारणी केल्याचे सांगितले. त्याने जेवणानंतर तंबाखू खाल्ल्याचे सांगितले. तोंडावाटे विष शरीरात जाऊ शकते. त्यासाठी कन्सेन्ट घेतली. त्याच्या सलग तीन दिवस रक्त तपासण्या करण्यात आल्या. त्या सामान्य आल्यात. त्यांच्यावर फवारणी विषबाधेचे उपचार करण्यात आले नाहीत.``
डॉ. मनीष श्रीगिरीवार,
अधिष्ठाता, वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ.

``शासनाचा नाकर्तेपणा झाकण्यासाठीचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. विषबाधेने मृत्यू होत नसल्याचे दाखविण्यासाठी रुग्णांच्या नातेवाइकांकडून अशा प्रकारचे पत्र लिहून घेतले जात आहे. या प्रकरणाची सर्वंकष चौकशी करण्यात यावी.``
देवानंद पवार, शेतकरी नेते

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com