इंग्रजी शाळेवरून नगरसेवकांत वाद 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 जानेवारी 2019

नागपूर - महापालिकेची एकमेव इंग्रजी बनातवाला हायस्कूल या शाळेच्या नव्या इमारतीत स्थलांतरणावरून बसप नगरसेवकांतील वाद चव्हाट्यावर आला. प्रकरण बसप प्रदेशाध्यक्षांपर्यंत पोहोचले असून, त्यांनी गटनेत्यांची कानउघाडणी केल्याची चर्चा महापालिका वर्तुळात रंगली. 

नागपूर - महापालिकेची एकमेव इंग्रजी बनातवाला हायस्कूल या शाळेच्या नव्या इमारतीत स्थलांतरणावरून बसप नगरसेवकांतील वाद चव्हाट्यावर आला. प्रकरण बसप प्रदेशाध्यक्षांपर्यंत पोहोचले असून, त्यांनी गटनेत्यांची कानउघाडणी केल्याची चर्चा महापालिका वर्तुळात रंगली. 

उत्तर नागपुरात टेकानाका येथील हबीबनगरात जी. एम. बनातवाला ही इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. येथे विद्यार्थ्यांची पटसंख्याही चांगली आहे. एकीकडे महापालिकेच्या शाळा बंद पडत असताना या शाळेतील सोयी, शिक्षणामुळे मुलांचा प्रतिसाद मिळत आहे. या शाळेसाठी माजी नगरसेवक असलम खान यांनी प्रचंड मेहनत घेतली. गरिबांच्या मुलांना महागड्या इंग्रजी शाळांमध्ये शिक्षण घेणे परवडत नाही. त्यामुळे ही शाळा गरीब विद्यार्थ्यांसाठी ज्ञानदानाचे केंद्र बनली. ही शाळा भाड्याच्या इमारतीत असून, दरवर्षी 1 लाख 29 हजार रुपये भाडेस्वरूपात मनपाला भरावे लागतात. त्यामुळे मनपाने तीन कोटी खर्च करून प्रभाग 2 मध्ये टेकानाक्‍यालगत नारी रोडवरील रॉय उद्योग बिल्डिंगजवळ स्वत:ची इमारत उभी केली. ही इमारत प्रशस्त असून, या इमारतीत हायस्कूलचे वर्गही स्थलांतरित केले. प्राथमिक आणि केजीचे वर्ग अद्याप स्थलांतरित झाले नाही. या परिसरातील गरीब मुलांना प्राथमिक व केजीचे शिक्षण घेणे सोयीचे व्हावे, यासाठी म्हणून हे वर्ग याच परिसरात राहावे, अशी माजी नगरसेवक असलम खान यांची भूमिका आहे. त्यांच्या या भूमिकेला बसपचे गटनेते मोहम्मद जमाल यांनीही पाठिंबा दिला व त्याच परिसरात ही शाळा राहावी, असे पत्र मनपाला दिले. मात्र, बसपचे नगरसेवक इब्राहिम टेलर यांनी या शाळा नव्या इमारतीत स्थलांतरित करावी, अशी आग्रही भूमिका घेत मनपाला पत्र दिले. यात दोन्ही नगरसेवकांत वाद निर्माण झाला. हे प्रकरण बसप प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांच्यापर्यंत गेले. त्यांनी या दोन्ही नगरसेवकांना बोलावून चांगलेच फैलावर घेतले. बसप नगरसेवकाने विश्‍वासात न घेता परस्पर मनपाला पत्र दिल्याचे गटनेते मोहम्मद जमाल यांनी प्रदेशाध्यक्षांना सांगितले. मात्र, यावरून ते आणखी भडकले. सर्व नगरसेवकांमध्ये समन्वय ठेवण्याची जबाबदारी गटनेत्यांची आहे. त्यात आपण कमी पडत आहात, अशा शब्दात मोहम्मद जमाल यांना त्यांनी सुनावले. शेवटी मोहम्मद जमाल यांनी दिलगिरी व्यक्त केल्याने वाद संपुष्टात आल्याची चर्चा मनपात रंगली आहे.

Web Title: Debate from Corporators from English School