मतदान घेऊन ठरविले बाळाचे नाव...

वृत्तसंस्था
बुधवार, 20 जून 2018

'बालक नाम चयन आयोग' या नावाखाली हा मतदानाचा कार्यक्रम पार पडला. या आयोगाचा लोगो हा भारताच्या निवडणूक आयोगाच्या लोगोशी मिळता-जुळता होता. या मतदानासाठी खासदार नाना पटोले हे देखील उपस्थित होते.

गोंदिया : गोंदियाच्या मिथुन व मानसी बंग या दाम्पत्याने आपल्या बाळाचे नामकरण करण्यासाठी एक अनोखी शक्कल लढवली. बाळाचे नाव काय ठेवायचे यासाठी एकमत व्हावे, यासाठी या दाम्पत्याने चक्क निवडणूक घेतली. यासाठी पोस्टर्स पासून मतपेटी पर्यंत सर्व तयारी केली होती.   

5 एप्रिलला जन्मलेल्या मुलाचे नाव ठेवण्यासाठी 15 जूनला ही निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत सर्व कुटुंबिय, मित्रमंडळी व नातेवाईकांनी मतदान करून व त्यानंतर मतमोजणी करून नाव ठरवले गेले. या निवडणुकीसाठी बाळाच्या तीन नावांचे पर्याय मतदारांसमोर ठेवण्यात आले होते. त्याप्रमाणे मतपत्रिकेवर ही नावे होती व त्यातील एक नाव मतदारांनी निवडले. या मतदानासाठी कोणतेही ईव्हीएम मशिन वापरले गेले नाही.

'बालक नाम चयन आयोग' या नावाखाली हा मतदानाचा कार्यक्रम पार पडला. या आयोगाचा लोगो हा भारताच्या निवडणूक आयोगाच्या लोगोशी मिळता-जुळता होता. या मतदानासाठी खासदार नाना पटोले हे देखील उपस्थित होते. 

देवरी तालुक्यातील कपडे व्यावसायिक मिथुन यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले की, 'आम्ही तीन नावे ठरवली होती, पण त्यातील एक निश्चित करण्यासाठी ही निवडणूक घ्यायचे ठरले. यक्ष, युवान, युविक या तीन नावांमधील एक नाव मतदानानंतर निश्चित होईल.' 15 जूनला 192 मतदारंपैकी 92 मते ही 'युवान' या नावाला मिळाली व बाळाचे 'युवान' हे नाव निश्चित झाले. बंग दाम्पत्याला पाच वर्षीय 'भूमी' नावाची मुलगी आहे. 

Web Title: To Decide Baby s Name Couple Opt for Voting