मलेरियात घट, मात्र निधीत कपात 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 एप्रिल 2017

रॅपिड चाचणीमुळे रक्ताच्या नमुन्यांचे निदान तत्काळ होते. तातडीने उपचाराच्या सोयी उपलब्ध होतात. यामुळे मलेरियाला लगाम घालण्यात यश आले. नागरिकांनी डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट करावी. पाणी साठवू नये. आठवड्यातील एक दिवस कोरडा पाळावा. रात्री मच्छरदाणीचा वापर करावा. थंडी वाजून ताप आल्यास लगेच डॉक्‍टरांशी संपर्क साधावा. 
-डॉ. मिलिंद गणवीर, सहायक संचालक, सार्वजनिक आरोग्य विभाग (मलेरिया) 

नागपूर - मलेरियाच्या रुग्णांमध्ये घट झाल्याचा दावा सरकारी यंत्रणेकडून होत आहे. तरी पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांत 8 हजार मलेरियाग्रस्तांची नोंद झाली. मलेरियाचा उद्रेक गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक झाला होता. यंदा रोग आटोक्‍यात असला, तरी त्याच्या प्रतिबंधासाठी राष्ट्रीय कीटकजन्य रोग कार्यक्रमावर करण्यात येणाऱ्या खर्चाच्या निधीत कपात करण्यात आली. यामुळे मलेरियाचा आलेख पुन्हा वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. 

"ऍनॉफिलस' डासांचा प्रकोप पूर्व विदर्भात आहे. आरोग्य कर्मचारी, सेवक, आशा स्वयंसेविका यांच्या माध्यमातून मलेरिया निर्मूलन मोहिमेला गती देण्यात आली. यामुळे आरोग्य विभागाच्या डायरीतील मलेरियाच्या नोंदीत घट झाली. नागपूर जिल्ह्यात दोनशेवर मलेरियाग्रस्तांची नोंद झाली. मलेरियावर नियंत्रण मिळविण्यात आरोग्य विभागाला यश आल्याचे सांगण्यात येते. 2015 मध्ये पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा आणि गडचिरोलीत 36 हजार 798 मलेरियाग्रस्तांची नोंद झाली होती. त्या तुलनेत यंदा केवळ 8 हजार मलेरियाग्रस्त आढळले. उपाययोजना म्हणून अल्झायमेथरीन, डेल्टामेथरीनची फवारणी केली जाते. 

जनजागरण निधीत 50 टक्के कपात 
मलेरियावर नियंत्रणासाठी राज्य शासनातर्फे राष्ट्रीय कीटकजन्य रोग कार्यक्रम राबविला जातो. दुर्गम भागात जनजागृती मोहीम, बैठक, गावपातळीवर शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रम राबविले जातात. सरकारने आयईसी (माहिती, शिक्षण आणि संवाद) प्रकल्पांतर्गत दिल्या जाणाऱ्या निधीला कात्री लावण्यात आली. प्रत्येक जिल्ह्याला 40 ते 50 हजार रुपये निधी मिळत असे. हा निधी अर्ध्यावर आणला. प्राथमिक आरोग्य केंद्राला समान वितरित केले तर 300 रुपयेदेखील वाट्याला येत नाहीत. पर्यवेक्षक, कर्मचाऱ्याला पूर्वी दीडशे रुपये मिळत; आता 100 रुपयांवर समाधान मानावे लागते. 

आकडे बोलतात 
वर्ष एकूण रुग्ण मृत्यू 
2013 - 11 हजार 260 25 
2014 - 08 हजार 334 - 18 
2015 - 36 हजार 778 - 21 
2016 - 8 हजार 235 - 6 

मलेरियाची लक्षणे 
थंडी वाजून ताप 
उलट्या 
डोकेदुखी 
सांधेदुखी 
अशक्तपणा 
शरीर जखडणे 

Web Title: Deficit in malaria patients