गावाच्या विकासासाठी ‘मिळून सारे आम्ही’

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 जानेवारी 2017

डिलिव्हरिंग चेंज फोरमच्यावतीने भारतात २४ आणि २५ जानेवारीला मुंबईत आंतरराष्ट्रीय परिषद होत आहे. जगभरात उद्योग, प्रशासन, कला आणि तंत्रज्ञान क्षेत्रात नेत्रदीपक बदल घडविणाऱया 'चेंज मेकर्स'चा सहभाग हे परिषदेचे वैशिष्ट्य आहे. दोन दिवसांच्या परिषदेत विविध विषयांवर चर्चासत्रे, नेटवर्किंग आणि ज्ञानाची देवाण-घेवाण होणार आहे. परिषदेच्या पार्श्वभूमीवर 'सकाळ' समुह महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासासाठी पाठपुरावा करीत असलेल्या क्षेत्रांमध्ये नेमके काय घडते आहे, काय घडवावे लागेल याचा विभागनिहाय आढावा घेत आहोत.

डिलिव्हरिंग चेंज फोरम
२४ व २५ जानेवारी २०१७
नेहरू सेंटर, मुंबई
अधिक माहिती व सहभागासाठी क्लिक करा
www.deliveringchangeforum.com

नागपूर - रामटेक तालुक्‍यातील सखाराम कोडापे यांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजनेंतर्गत विहिरी मिळाली. पण, विहिरीतून पाण्याचा उपसा करण्यासाठी वीजजोडणी आणि कृषिपंप दोन वर्ष लोटूनही मिळाले नाही. यासाठी त्यांनी तिन्ही विभागांच्या पायऱ्या झिजविल्या. मात्र, जिल्हा प्रशासनाने तीन महिन्यांपूर्वी रामटेक तालुक्‍यात राबविलेल्या ‘मिळून सारे आम्ही’ उपक्रमात त्यांची समस्या मार्गी लागली. या उपक्रमाला उपजिल्हाधिकारी जायभाये यांनी दिली.

सखाराम यांच्यासारखे इतर लाभार्थ्यांचे प्रश्‍न ‘मिळून सारे आम्ही’ या उपक्रमाच्या माध्यमातून सुटू शकतात, ही बाब जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्या लक्षात आली. त्यानंतर रोहयोच्या उपजिल्हाधिकारी मनीषा जायभाये, कृषी विभागाचे उपविभागीय अधिकारी लाड यांच्या संकल्पनेतून विविध विभागांच्या योजना एकत्रितपणे राबविण्याचा निर्णय घेतला. यासाठी सर्वांत प्रथम आदिवासीबहुल रामटेक तालुक्‍याची निवड झाली. त्यानंतर एक फॉर्म तयार करून घेतला. यात ग्रामविकासापासून ते कृषीविषयक कोणत्या योजनांची गरज आहे याची माहिती गावकऱ्यांकडून भरून घेतली. ही माहिती संकलित करून गावनिहाय कोणत्या गावातील नागरिकांना कुठल्या योजनाची गरज आहे. याचा एकत्रित डाटा तयार झाला.

समस्यांच्या निराकरणासाठी ग्रामविकास, कृषी, समाजकल्याण, महिला बालकल्याण, पंचायत, वीज, महसूलसह इतर विभागांचे एकत्रित शिबिर घेण्यात आले. शिबिरात अनेकांच्या प्रश्‍नांची सोडवणूक जागेवरच झाली. नागरिकांनी अर्जामध्ये नमूद केलेल्या योजनेचा लाभ तेव्हाच मिळवून दिला. त्यामुळेच ‘मिळून सारे आम्ही’ हा उपक्रम सर्वांच्या जिव्हाळ्याचा झाला आहे. प्रशासनाने मनात आणले आणि ग्रामविकासाच्या सर्व योजना एकत्रित राबविल्या तर काय क्रांती घडू शकते, हे उपक्रमाने दाखवून दिले. ग्रामविकासाचा हा प्रयोग आता जिल्हाभरात राबविणार येणार आहे.

Web Title: Delivering Change Forum Rural area of Vidarbha