विश्‍वास बसेल का? खड्ड्यांमुळे झाली प्रसूती! 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2019

  • चालत्या बसमध्ये महिलेस कन्यारत्न 
  • एसटी पोहोचली नांदगावच्या ग्रामीण रुग्णालयात 
  • प्रसूती वेळेआधीच झाल्याच्या प्रतिक्रिया 
  • चालक व वाहकावर कौतुकाचा वर्षाव 

नांदगावखंडेश्‍वर (जि. अमरावती) : माता व बालमृत्यू रोखण्यासाठी सरकारस्तरावरून जनजागृतीसह कोट्यवधींचा खर्च करण्यात येत आहे. एकाही महिलेची प्रसूती घरी होऊ नये, असा सरकारचा दंडक आहे. यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. गर्भवतींची जबाबदारी आशा सेविकांना सोपविली आहे. सरकार आपल्यास्तरावरून कोणत्याही प्रकारची चूक होऊ न देण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, सरकारचे रस्त्यांवरील खड्ड्यांकडे दुर्लक्ष होत आहे. याच खड्ड्यांमुळे महिलेची प्रसूती झाली. 

अमरावती ते यवतमाळ या मार्गात मोठमोठे खड्डे पडले आहेत. रस्त्याकडे बघितल्यास रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ता असाच प्रश्‍न सामान्यांना पडतो. खड्ड्यांमुळे वाहन चालवनेही कठीण होऊन बसले आहे. खड्ड्यांमुळे वाहनधारकांना समस्यांच्या सामना करावा लागत असून, अनेक आजारांना समोरे जावे लागत आहे. नागरिकांचे हाल होत असतानाही सार्वजनिक बांधकाम विभाग रस्त्यांच्या दुरुस्थीकडे दुर्लक्ष करीत आहे. या खराब रस्त्यांच्या फटका गर्भवतीला बसला असं म्हटल तर? तुम्ही म्हणाल काय बोलता राव. हे खरं आहे. या खराब रस्त्यांमुळे गर्भवतीला बसमध्येच प्रसूती झाली. 

Image may contain: 2 people, sky and outdoor
बससह चालक व वाहक. 

गुरुवारी (ता. 28) अकोट आगाराची अकोट ते यवतमाळ एसटी (एमएच 14 बीटी 4361) यवतमाळला जात होती. ही गाडी चोरमाहुली येथे आल्यानंतर आठ महिन्यांची गरोदर असलेली वृषाली अमोल मोहकार ही पती अमोल मोहकारसह जिल्ह्यातील यावली शहीद येथून माहूरनजीक दही सावळी या गावी जाण्यासाठी गाडीत बसले. एसटी अमरावती येथून नांदगाव खंडेश्‍वरकडे निघाली. त्यानंतर माहुलीचोरजवळ गाडीतील गरोदर वृषाली यांच्या पोटात दुखण्यास सुरुवात झाली. याबाबतची माहिती पतीने बसवाहक ए. के. जाधव यांना दिली. 

त्यांनी याबाबत चालक व्ही. ए. इंगळे यांना कल्पना दिली. त्यांनी प्रवाशांच्या मदतीने जवळ असलेले नांदगावखंडेश्‍वर येथील ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षिका डॉ. प्रवीणा देशमुख यांच्याशी संपर्क केला. बसमध्ये असलेल्या महिला प्रवाशांनी गरोदर वृषाली यांना मदत केली. परंतु, बस ग्रामीण रुग्णालयाच्या जवळ येताच वृषालीची प्रसूती झाली. बसचालक व्ही. ए. इंगळे व वाहक ए. के. जाधव यांच्या प्रसंगावधानाने नांदगावखंडेश्‍वरच्या ग्रामीण रुग्णालयात बस तत्काळ नेण्यात आली. 

ही बातमी अवश्य वाचा - सुरक्षित प्रसूतीचा दावा फोल, वाचा काय झाले...

ग्रामीण रुग्णालयामध्ये डॉक्‍टराची चमू सज्ज होती. त्यांनी लगेच महिला व बाळाची बसमध्येच तपासणी केली. त्यानंतर बसमधून स्ट्रेचरच्या साहाय्याने महिलेला ग्रामीण रुग्णालयामध्ये नेण्यात आले. डॉक्‍टरांनी महिला व बाळाला भरती केले असून, बाळाची व महिलेची प्रकृती उत्तम असल्याचे अधीक्षिका डॉ. प्रवीणा देशमुख यांनी सांगितले. एसटी बसने प्रवास करीत असताना अनेकदा कटू अनुभव येत असतो. परंतु, चालक व वाहकाच्या समयसूचकतेमुळे महिला व तिच्या बाळाला वेळीच रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामुळे सदर चालक व वाहकावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. 

भयंकर बाब - ऑपरेशन थिएटरमध्ये वापरतात वापरलेले "हातमोजे'

रस्त्याचे डांबरीकरण तातडीने करा

अमरावती ते यवतमाळ या मार्गात मोठमोठे खड्डे असल्यामुळे महिलेची प्रसूती वेळेआधीच झाली असल्याच्या प्रतिक्रिया सर्वत्र उमटत आहे. तरी या प्रकरणाची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित या मार्गाची दुरुस्ती करावी, अशी मागणी प्रवाशांनी केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Delivery on a moving bus