"स्थानिकच उमेदवार आमचा हक्क' ; भाजपमध्ये कलहाचे संकेत 

सतीश घारड 
03.00 AM

कोणत्याही राजकीय पक्षाचे चिन्ह नाही. तर यातील चारही चेहरे भाजपचे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे कल्पना चहांदे यांच्या उमेदवारीला थेट विरोध असल्याचे मानले जात आहे. 

टेकाडी, (जि. नागपूर) :  जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी आता खऱ्या अर्थाने रंगत येऊ लागली आहे. पारशिवनी तालुक्‍यातील टेकाडी-कांद्री जिल्हा परिषद सर्कलमध्ये भाजपने स्थानिक उमेदवार द्यावा यासाठी मोहीम उघडण्यात आली आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष अनुसूचित जातीसाठी राखीव असून टेकाडी-कांद्री सर्कलमध्येही समान आरक्षण आहे हे विशेष. 

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी राजकीय पक्षांचे उमेदवार जवळपास निश्‍चित झालेले आहे. मात्र, भारतीय जनता पक्षातर्फे निवडणूक लढणाऱ्या उमेदवाराला स्थानिक नेत्यांनी घरचा अहेर देण्यास सुरुवात केली असल्याचे चित्र दिसू लागले आहे. टेकाडी-कांद्री सर्कलमधील भाजपकडून इच्छुक चार महिला उमेदवारांनी एकत्र येऊन स्थानिकांना उमेदवारी द्यावी अन्यथा दुसऱ्या पक्षाला मतदान करा, अशी पत्रके प्रकाशित केली आहेत. टेकाडी सर्कलमधून कॉंग्रेसच्या रश्‍मी श्‍यामकुमार बर्वे, शिवसेनेच्या वैशाली ईश्‍वरदास पाल (गणेर), राष्ट्रवादीकडून विद्या गणेश पानतावणे तर भाजपकडून कल्पना शंकर चहांदे हे उमेदवार निश्‍चित मानले जात आहेत. 

मतदारांसोबत भेटीगाठी सुरू

जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी येथील लढत महत्त्वाची मानली जात आहे. परंतु, निवडणुकीच्या तोंडावर स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी "स्थानिक उमेदवार, आमचा हक्क', "उमेदवार हवा पार्सल नको' असे पत्रक तयार करून त्यावर शालिनी लीलाधर बर्वे, इंदिरा किशोर मनपिया, प्रियांका धर्मेंद्र गणवीर व टेकाडीच्या सरपंच सुनीता पृथ्वीराज मेश्राम यांचा फोटो प्रसिद्ध केला आहे. "स्थानिक लाओ गाव बचाओ' असा जयघोष देत स्थानिक उमेदवार नाही तर इतर कुठल्याही पक्षाच्या स्थानिक उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन केले आहे. विशेष म्हणजे यात कोणत्याही राजकीय पक्षाचे चिन्ह नाही. तर यातील चारही चेहरे भाजपचे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे कल्पना चहांदे यांच्या उमेदवारीला थेट विरोध असल्याचे मानले जात आहे. 

खुलासा करून दिलासा

 पत्रकामध्ये प्रियांका गणवीर यांचा फोटो आहे. दुसरीकडे त्याचे पती धर्मेंद्र सोशल मीडियावरून पत्रकाशी कोणताही संबंध नसून निषेध नोंदवून स्वत:ला सेफ करताना दिसत आहेत. स्थानिकांच्या उमेदवारीचे लोण लवकरच इतर ठिकाणी पसरू शकते असे चित्र दिसू लागले आहे. याचा सर्वच पक्षाला येत्या काळात सामना करावा लागू शकतो. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demand for a local candidate in ZP election