पत्नी पीडितांना हवा पुरुष आयोग

मनीषा मोहोड
गुरुवार, 22 ऑगस्ट 2019

नागपूर : सहा वर्षांच्या प्रेमप्रकरणानंतर मतभेत झाल्याने, तिने बलात्काराचा गुन्हा दाखल केला. त्यामुळे याचे कुटुंब, करिअर सगळंच विस्कळीत झालं... दुसऱ्या प्रकरणात कुटुंबाच्या सहमतीने लग्न केले; पण एकाच महिन्यात ती प्रियकराकडे निघून गेली. बदनामी मात्र, याचीच झाली. आता विवाहासाठी स्थळ मिळत नाही. लग्नानंतर पत्नी आई-वडिलांबरोबर राहू देत नाही, रोजच्या भांडणामुळे याला नैराश्‍य आले आहे. अशा एक ना अनेक समस्या घेऊन हजारो पुरुष समोर येत आहेत. या समस्या सोडविण्यासाठी महिलांप्रमाणेच पुरुषांचाही स्वतंत्र पुरुष आयोग असावा, अशी मागणी पीडित पुरुषांकडून होत आहे.
काही महिला कायद्याचा दुरुपयोग करून पुरुषांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे महिलांप्रमाणेच पुरुषांवरील अन्याय कमी व्हावा व कुटुंबव्यवस्था टिकून राहावी, या हेतूने "पुरुष आयोग' स्थापन करावा, अशी मागणी पुरुष हक्क संरक्षण समिती; तसेच शहरातील पुरुषवर्गाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. जेंडर इक्वॅलिटी ऑर्गनायजेशनतर्फे नागपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय कार्यशाळेत, जगभरातील पुरुषांनी सहभाग नोंदवीत महिलांनी केलेल्या अत्याचाराचा पाढा वाचला. एनसीआरबीच्या अहवालानुसार सद्यस्थितीत महिलांच्या तुलनेत पुरुषांवर अधिक प्रमाणात अत्याचार होत असून, प्रतिवर्षी 91 हजारांपेक्षा अधिक पुरुष महिलांच्या त्रासामुळे आत्महत्या करत आहेत. आईवडिलांबरोबर राहू देत नाही, शारीरिक संबंधांना नकार देते, जेवण देत नाही, प्रसंगी मारहाणही करते अशा स्वरूपाच्या तक्रारी पुरुष करत आहेत. आजवर अनेक पुरुषांना खोट्या केसेस लावून अटकही झाल्याची भीती पुरुषांनी व्यक्त केली आहे. हे टाळण्यासाठी व कुटुंबव्यवस्था टिकावी यासाठी पुरुष आयोग हवा, अशी भूमिका पुरुष हक्क समिती व इतर संघटनांनी स्पष्ट केली आहे. पुरुष हक्‍क संरक्षण समिती पीडित पुरुषांसाठी काम करीत आहे. देशभरातील, सुमारे 50 स्वयंसेवी संघटना या पुरुषांच्या हक्कासाठी कार्य करीत असून, यासाठी एसआयएफने अखिल भारतीय पुरुषांसाठी हेल्पलाइनही सुरू केली आहे. (8882- 498- 498) या हेल्पलाइन क्रमांकावर महिन्याला तब्बल 50 हजार तक्रारी प्राप्त होत असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

पुरुषांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले आहेत. एनसीआरबीच्या अहवालानुसार खोट्या तक्रारी करून पुरुषांवर गुन्हे दाखल केल्याने, जगभरात 1 कोटीपेक्षा अधिक स्रियांवर कारवाई झाली आहे. रक्षाबंधनाच्या निमित्ताने, पुरुषांनाच आता त्यांच्या आई, बहिणीकडून रक्षणाची गरज व्यक्त केली जात आहे. या विषयावर ट्‌विट केले असता, हजारो पुरुषांनी याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
-आनंद बागडे, अध्यक्ष, जेंडर इक्वॅलिटी ऑर्गनायजेशन, नागपूर.

आमच्या संघटनेतर्फे नागपूरमध्ये 11 वी राष्ट्रीय परिषद नुकतीच पार पडली. यात देशभरातील पीडित पुरुषांनी सहभाग नोंदवीत, त्यांच्या तक्रारी मांडल्या. पीडित पुरुषांचे संघटन करण्यावर आमचा भर असून, यासाठी प्रत्येक जिल्हा व तालुकापातळीवर आमची संघटना कार्यरत आहे. नागपूर येथे दर शनिवारी सायंकाळी सहा ते नऊ धंतोली उद्यानात पीडित पुरुषांची बैठक होते.
-निशांत कांबळे, उपाध्यक्ष, जेंडर इक्वॅलिटी ऑर्गनायजेशन, नागपूर.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: demand Male Commission