अकार्यक्षम गटविकास अधिकाऱ्यांवर पदाधिकाऱ्यांकडून कारवाईची मागणी

मनोहर बोरकर
शनिवार, 30 जून 2018

गटविकास अधिकारी अनिल वाघमारे हे कामावर रुजू झाल्यापासून एक दिवसही मुख्यालयात हजर राहून त्यांनी कर्तव्य बजावलेले नाही. त्यामुळे तालुक्याच्या विकासावर विपरीत परिणाम झाला असून त्यांची चौकशी करून कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी सभापती बेबी लेकामी, उपसभापती नितेश नरोटी, सदस्य जनार्धन नल्लावार व पदाधिकाऱ्यांनी मुख्यकार्यपालन अधिकारी यांना निवेदनातून केली आहे.

एटापल्ली (गडचिरोली) - येथील गटविकास अधिकारी अनिल वाघमारे हे कामावर रुजू झाल्यापासून एक दिवसही मुख्यालयात हजर राहून त्यांनी कर्तव्य बजावलेले नाही. त्यामुळे तालुक्याच्या विकासावर विपरीत परिणाम झाला असून त्यांची चौकशी करून कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी सभापती बेबी लेकामी, उपसभापती नितेश नरोटी, सदस्य जनार्धन नल्लावार व पदाधिकाऱ्यांनी मुख्यकार्यपालन अधिकारी यांना निवेदनातून केली आहे.

वाघमारे हे गेल्या एका वर्षापासून पंचायत समीती एटापल्ली येथे कार्यरत आहेत ते रुजू झाल्यापासून मुख्यालयात उपस्थित न राहता 35 की. मी. अंतरावरील अहेरी या शहरातून ये-जा करतात त्यामुळे इतरही विस्तार अधिकारी व कर्मचारी हे बाहेरील शाहरातून ये-जा करून कर्तव्य बजावत आहेत परिणामी विकास कामे व योजनांवर विपरीत परिणाम होऊन, घरकुल, शौचालय, सिंचन विहिरी व इतर शेतकरी, शेतमजूर व विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शासकीय लाभच्या योजनांपासून वंचित रहावे लागत आहे.

पंचायत समिति मालकीच्या मुख्य बाजारपेठेतील दोन ते तीन एक्कर भूखंडावर भूमाफियांनी बेधड़क अतिक्रमण करून भूखंड हड़प करण्याचा प्रकार होतांना गटविकास अधिकारी वाघमारे हे नागरिकांच्या तक्रारीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात असेही आरोप सभापती व इतर पदाधिकाऱ्यांनी निवेदनातून केले आहेत.

अशा अकार्यक्षम गटविकास अधिकारी अनिल वाघमारे यांच्या संपूर्ण कार्यकाळाची सखोल चौकशी करून कठोर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन उभारले जाईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

तक्रारीतील संपुर्ण आरोप खोटे व बिनबुडाचे आहेत मी माझे कर्तव्य प्रामाणिक बजावत असून कोणतीही चौकशीला सामोरे जाण्याची माझी तयारी आहे, असे गटविकास अधिकारी अनिल वाघमारे यांनी स्पष्ट केले आहे.

Web Title: demanded to action on the block Development Officer