डॉक्‍टरला मागितली ५० लाखांची खंडणी

डॉक्‍टरला मागितली ५० लाखांची खंडणी

नागपूर - एका कुख्यात गुंडाने टोळीच्या मदतीने एका डॉक्‍टरला पत्नीसह मुलाच्या अपहरणाची धमकी देऊन ५० लाखांची खंडणी मागितली. या प्रकरणी अंबाझरी पोलिसांनी चौघांना अटक केली. मोहसीन खान (रा. मोमिनपुरा), त्याचा भाऊ फिरोज खान, मंगेश उईके (रा. धंतोली) आणि राधेश्‍याम सरकार (धंतोली) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. मोहसीन आणि फिरोज ही भावंडे कुख्यात असून त्यांच्यावर यापूर्वी अनेक गुन्हे दाखल आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. आशीष अरुणराव चौधरी (४४) हे पत्नी सपना आणि दोन मुलांसह शिवाजीनगरातील लोटस अपार्टमेंटमध्ये राहतात. सपना यांना ८ फेब्रुवारीला सकाळी एक चिठ्ठी मिळाली. या चिठ्ठीत ५० लाखांची खंडणी मागण्यात आली. पैसे न दिल्यास अपहरण करून जिवे मारण्याची धमकी यात देण्यात आली. त्यानंतर ११ फेब्रुवारीला रात्री साडेनऊ वाजता एका आरोपीने मोबाईलवरून त्यांच्याशी संपर्क केला. या वेळी त्यांना चिठ्ठी वाचली का? असे विचारले. तसेच ५० लाख रुपये खंडणी तयार ठेवण्यास सांगण्यात आले. फोन झाल्यानंतर घाबरलेल्या डॉ. चौधरी यांनी अंबाझरी पोलिसांत तक्रार दिली. अंबाझरी पोलिस व गुन्हे शाखा पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. मोबाईल क्रमांकावरून अब्दुल वाहिद अब्दुल हमीद (रा. मोमिनपुरा) याला गुन्हे शाखेने ताब्यात घेतले.  त्याची चौकशी केली असता त्याने दुसऱ्याच्या नावाचे एक सीम कार्ड आरोपी मोहसीन खान याला दिल्याचे सांगितले. गुन्हे शाखेसोबतच अंबाझरी पोलिसही तपास करीत होते. मोहसीन गुन्हे शाखा पोलिसांच्या हाती लागण्यापूर्वी अंबाझरी पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्या वेळी त्याने गुन्ह्याची कबुली दिली. अब्दुल वाहिद याच्या सहभागासंदर्भात चौकशी सुरू असल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात येते. तो गांधीसागर तलाव परिसरात शनिवारी भरणाऱ्या चोर बाजारातील दुकानदारांकडूनही हप्ता वसुली करीत असल्याची माहिती आहे. 

असा लागला सुगावा
खंडणी मागण्यासाठी केलेल्या फोन नंबरवरून अब्दुल वाहिद याला ताब्यात घेतले. त्याने सीम कार्ड कुख्यात मोहसीन आणि फिरोज खान यांना दिल्याचे सांगितले. त्यावरून फिरोजला अटक केली. त्याने मंगेश आणि भाऊ मोहसीनचे नाव सांगितले. मंगेशला पोलिस खाक्‍या दाखवताच त्याने मास्टरमाइंड राधेश्‍यामचे नाव सांगितले. 

कंपाउंडरच निघाला मास्टरमाइंड
राध्येश्‍याम सरकार हा पाच वर्षांपासून डॉ. चौधरी यांच्याकडे पॅथॉलॉजिस्ट आणि कंपाउंडर म्हणून काम करतो. त्याला डॉक्‍टर चौधरी यांची कमाई आणि घरातील प्रत्येक बाबीची माहिती आहे. डॉ. चौधरी यांचे पत्नी व मुलांवरील प्रेम पाहून ५० लाख रुपये खंडणी देतील, अशी खात्री होती. त्यामुळे त्याने घरमालक मंगेश उईके याला सांगितले. त्यानंतर खंडणीचा कट रचला गेला.

मुलाच्या हत्येचा कट?
डॉक्‍टर चौधरी यांनी पैसे न दिल्यास मुलाचे अपहरण करायचे. त्याला फार्महाउस किंवा जंगलात नेऊन बंधक बनवायचे. त्यानंतर मुलाच्या जिवाच्या बदल्यास एक कोटी रुपये मागायचे. पैसे न दिल्यास मुलासोबत बरेवाईट करण्याचा कटही आरोपींनी रचला होता, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com