स्वच्छ, सुंदर वानाडोंगरीला डेंगीचे ग्रहण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 नोव्हेंबर 2019

2017 मध्ये महाजनवाडी परिसरातील एका पोलिसाचा तर एका शिक्षक दाम्पत्याचा एकुलता एक मुलगा डेंगीने मरण पावला. डेंगीच्या डासाची उत्पत्ती रोखणे हे आपल्या हातात आहे. विविध ले-आउट्‌समध्ये सांडपाणी हे रस्त्यावर सोडले जाते. ते रस्त्यावर न सोडता एक शोषखड्डा तयार करून त्यात सोडण्याचे आवाहन "स्वच्छ सुंदर वानाडोंगरी'चे संयोजक शांताराम पाटील यांनी केले.

वानाडोंगरी(जि.नागपूर) ः दररोज सकाळी कचरा उचलणाऱ्या गाडीतून नागरिकांना स्वच्छ व सुंदर वानाडोंगरी बनविण्याचे आवाहन केले जाते. तरीही वानाडोंगरी नगर परिषदेच्या नगरसेविकेच्या पतींनासुद्धा डेंगीची लागण झाल्याचे उघड झाले. त्यामुळे स्वच्छ, सुंदर वानाडोंगरीला अस्वच्छतेचे ग्रहण लागल्याची चर्चा आहे. नगरसेविकेच्या पतींवर चार दिवसांपासून उपचार सुरू आहेत. प्राप्त माहितीप्रमाणे पाच रुग्ण बरे झालेले आहेत.

वानाडोंगरी परिसरातील मनीषा धोटे, आदी महतो, विशाल नरवाडे, विजय भोसले व लोकेश रोकडे यांना डेंगीची लागण झाली होती. परंतु, उपचारानंतर ते बरे झालेले आहेत. परंतु, वानाडोंगरी नगर परिषदेच्या नगरसेविका वंदना मुडे यांचे पती दादाराव मुडे यांनासुद्धा डेंगीची लागण झाली. ते नागपूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. वानाडोंगरी परिसरातील पन्नास हजार लोकसंख्या असलेल्या नागरिकांसाठी दहा आरोग्यसेवकांची गरज असतानासुद्धा फक्त एक आरोग्यसेवक आहे. दोन हजार लोकसंख्या असलेल्या खैरीपन्नासे या गावात प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आहे. त्या उपकेंद्रामध्ये वानाडोंगरीचा समावेश आहे. वानाडोंगरी ही वस्ती नागपूर-हिंगणा या मुख्य रस्त्यावर असल्यामुळे येथील रुग्ण हे नागपूरला किंवा हिंगण्याला जातात.

पन्नास हजार लोकसंख्या असलेल्या वानाडोंगरीमध्ये गुरांचा दवाखाना आहे; पण माणसांचा एकही शासकीय दवाखाना नाही. 2017 मध्ये महाजनवाडी परिसरातील एका पोलिसाचा तर एका शिक्षक दाम्पत्याचा एकुलता एक मुलगा डेंगीने मरण पावला. डेंगीच्या डासाची उत्पत्ती रोखणे हे आपल्या हातात आहे. विविध ले-आउट्‌समध्ये सांडपाणी हे रस्त्यावर सोडले जाते. ते रस्त्यावर न सोडता एक शोषखड्डा तयार करून त्यात सोडण्याचे आवाहन "स्वच्छ सुंदर वानाडोंगरी'चे संयोजक शांताराम पाटील यांनी केले.

वानाडोंगरी परिसरात अनेक ले-आउट्‌स पडलेले आहे. अनेकांचे भूखंड हे रिकामे आहेत. सांडपाणी वाहून नेण्याची व्यवस्था नसल्यामुळे विविध ले-आउटमधील खाली प्लॉटमध्ये पाणी साचलेले आहे. त्यामुळे सर्वत्र डासांचा प्रकोप वाढलेला आहे. थंडीचे दिवस असतानाही जनतेला पंखे सुरू करून झोपावे लागते. दररोज फक्त लाउडस्पीकरवरून "स्वच्छ-सुंदर वानाडोंगरी' बनविण्याचे आवाहन केले जाते. प्रत्यक्षात मात्र ठोस उपाययोजना करताना दिसत नाही. प्रत्येक नागरिकाने आपला परिसर स्वच्छ-सुंदर ठेवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन नगर परिषदेच्या वतीने करण्यात येत आहे.  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dengue eclipse wanadongri