अमरावतीला डेंगीचा डंख 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 नोव्हेंबर 2019

अमरावती : गतवर्षी महापालिका क्षेत्रात थैमान घालणाऱ्या डेंगीचा प्रकोप यंदाही कायम आहे. महापालिकेचा आरोग्य विभाग यावर्षीही या आजाराचे आक्रमण थोपविण्यात अपयशी ठरला आहे. मनपा क्षेत्रात आतापर्यंत 124 रुग्ण पॉझिटीव्ह आढळले आहेत. त्या तुलनेत ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा अधिक चांगली राहली असून तेथे 69 रुग्ण आढळल्याची नोंद जिल्हा हिवताप कार्यालयाने दिली.

अमरावती : गतवर्षी महापालिका क्षेत्रात थैमान घालणाऱ्या डेंगीचा प्रकोप यंदाही कायम आहे. महापालिकेचा आरोग्य विभाग यावर्षीही या आजाराचे आक्रमण थोपविण्यात अपयशी ठरला आहे. मनपा क्षेत्रात आतापर्यंत 124 रुग्ण पॉझिटीव्ह आढळले आहेत. त्या तुलनेत ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा अधिक चांगली राहली असून तेथे 69 रुग्ण आढळल्याची नोंद जिल्हा हिवताप कार्यालयाने दिली.
गतवर्षी डेंगीने शहरात थैमान घातले होते. महापालिका क्षेत्रात या अजाराने ग्रस्त व पॉझिटीव्ह आढळलेल्या रुग्णांच्या संख्येने महापालिकेविरोधात वातावरण तयार झाले. त्यात तत्कालीन आरोग्य अधिकाऱ्यांना दोष देत हटविण्याची मागणी झाली. त्यावेळी बडनेरा मतदारसंघातील रवी नगर, साईनगर, आकोली हा भाग डेंगी हिट गणल्या गेला होता. जिल्हा हिवताप विभागाच्या माहितीनुसार 3 हजार 600 संशयित रुग्ण आढळले होते. यंदा हा आकडा कमी असला तरी व्हायरस फिव्हरसोबत डेंगीच्या रुग्णांचा आकडा महापालिकेच्या आरोग्य विभागाचे अपयश अधोरेखीत करणारा आहे. महापालिकेचे आरोग्य अधिकारी मात्र यंदा आकडा कमी असल्याचे सांगून मुक्त होण्याचाच प्रयत्न अधिक करताना दिसत आहेत.
जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत 818 रुग्णांचे रक्तजल नमूने तपासणीकरिता पाठविण्यात आले होते. त्यातील महापालिका क्षेत्रात 124 व व ग्रामीण भागात 69 अशा एकूण 193 रुग्ण डेंगीचे आढळले आहेत. वैद्यकीय अहवालानुसार या रुग्णांची 'एलायझा' चाचणी पॉझिटीव्ह ठरली आहे. या आंजाराने मृत्यू झाल्याची नोंद स्थानिक पातळीवर नसली तरी यातील मृत पावलेले रुग्ण उपचाराकरिता जिल्ह्याबाहेर गेले असल्याने त्यांची नोंद होऊ शकलेली नाही ही सत्यता आहे.

आरोग्य विभागाचे दावे फोल
यंदा डेंगीवर पूर्ण नियंत्रण असल्याचा महापालिकेच्या आरोग्य विभागाचा दावा तपासणी अहवालाने खोटा ठरवला आहे. 124 रुग्ण पॉझिटीव्ह आढळले असून यातील बहुतांश रुग्ण गाडगेनगर व राजापेठ परिसरातील आहेत. हे दोन्ही भाग यंदा डेंगी हिट आहेत. खासगी किंवा शासकीय रुग्णालयातून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे मनपाचा आरोग्य विभाग नमूने तपासणीसाठी गोळा करून सेंटीनल सेंटरला पाठवत आहे.

उपाययोजना थंड
डेंगीवर नियंत्रणासाठी आवश्‍यक असलेल्या फवारणी व धुवारणीसह औषधोपचाराचे काम थंड बस्त्यात आहे. खुद्द नगरसेवकांनी तक्रारी केल्यानंतरही या कामांना अनेक प्रभागांत सुरुवातही झालेली नाही. गतवर्षी आयुक्तांनी स्वतः मैदानात उतरून सहकारी अधिकाऱ्यांना सोबत घेत मोहीम राबविली. यंदा त्यांनी विश्‍वास टाकलेला आरोग्य विभाग मात्र नमूने जमा करून अहवाल गोळा करीत आकड्यांचा खेळ खेळण्यातच व्यग्र असल्याचे चित्र आहे.

फवारणी व धुवारणीचे कंत्राट 
यावर्षी गाडगेनगर, दस्तूर नगर, नवसारी अशा विविध भागात डेंगीचे रुग्ण आढळले आहेत. या भागात फवारणी व धुवारणीसाठी कंत्राटदार नियुक्त करण्यात आला असून उपाययोजना सुरू असल्याचे महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dengue stings to Amravati