नागपूर जिल्ह्याला डेंगीचा विळखा

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नागपूर ः नागपूर जिल्ह्यासह शहरात बदलत्या वातावरणामुळे स्क्रब टायफसपासून तर मलेरिया, स्वाइन फ्लू आणि डेंगीचा उद्रेक आलटून पालटून सुरू आहे. गतवर्षीप्रमाणे यावर्षीही डेंगीचा नागपूर जिल्ह्यात कहर सुरू आहे. सव्वाशेपेक्षा अधिक जणांना डेंगीचा डंख लागला आहे. तर जानेवारीपासून तर आतापर्यंत शहरात 102, तर ग्रामीण भागात 25 जणांना डेंगीची लागण झाली आहे. विशेष असे की, ऑगस्ट महिन्यात 49 जणांना तर सप्टेंबरच्या 18 दिवसांत 42 जण डेंगीग्रस्त असल्याचे आढळून आले. मात्र महापालिकेचा आरोग्य विभाग ढिम्म आहे. केवळ नागरिकांवर दंडात्मक कारवाईचा बडगा मात्र उगारण्यात महापालिका पुढे आहे.
यावर्षी 2019 सालच्या जानेवारी महिन्यात नागपूर जिल्ह्यात 25 जणांना डेंगीचा ताप आला असून यावर्षीही डेंगीचा डंख कायम आहे. यानंतर थेट ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये डेंगीचा नागपूर शहरात उद्रेक झाल्याचे दोन्ही महिन्यांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास दिसून येते. नागपूरच्या ग्रामीण भागातही 25 जण डेंगीग्रस्त आढळले असल्यामुळे आरोग्य विभाग मात्र खडबडून जागा झाला. या भागात उपाययोजना सुरू केला असल्याचे आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. मिलिंद गणवीर म्हणाले.
शहरात डेंगीचा उद्रेक कायम असूनही याकडे महापालिकेचा आरोग्य विभाग गंभीर नाही. स्वाइन फ्लूचा विळखाही कायम असून शहरात 266 जणांना लागण झाली असून 8 मृत्यू शहरातील असल्याची माहिती आहे. याशिवाय स्क्रब टायफसचेही पाच रुग्ण आढळले असल्याचे निदानातून स्पष्ट झाले.

मागील वर्षी उपराजधानीत 562 डेंगीग्रस्त
पूर्व विदर्भात मागील वर्षी 1196 डेंगीग्रस्त आढळून आले असून यापैकी 11 जण दगावले होते. यातील 2 मृत्यू नागपूरचे तर 9 मृत्यू वर्ध्याचे होते. तर 665 डेंगीग्रस्त नागपूर जिल्ह्यातील होते. यात शहरातील 562 तर नागपूर ग्रामीण भागातील 103 डेंगीग्रस्त होते. यावर्षी जानेवारीपासूनच डेंगीच्या रुग्णांची संख्या शहरात वाढत असून आतापर्यंत 102 डेंगीग्रस्तांची नोंद झाली आहे.

29 शाळांमध्ये आढळल्या डेंगीच्या अळ्या
महापालिकेच्या वतीने राबवण्यात आलेल्या मोहिमेत 29 शाळांमध्ये डेंगीच्या डास अळ्या आढळून आल्या आहेत. यामुळे संबधित विभागाने शाळांना नोटीस बजावून त्या स्वच्छ करण्याचे आदेश दिले. शाळा तसेच नागरिकांच्या घरावर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला. विशेष असे की, नागपूर शहरात आढळून आलेल्या डेंगीग्रस्तांमध्ये मुलांचा सर्वाधिक समावेश असल्याची माहिती पुढे आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com