ठेवीदारांना कोट्यवधींनी लुबाडले

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019

नागपूर : बॅंकेत खाते काढून विविध योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास दामदुप्पट आकर्षक व्याज देण्याचे आमिष दाखवून ठेवीदारांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी पूनम अर्बन बॅंकेच्या दोन संचालकांना अटक केली. चंद्रकांत अजाबराव बिहारे आणि सुभाष रामकुमार शुक्‍ला अशी अटक करण्यात आलेल्या संचालकांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रकांत बिहारे आणि सुभाष शुक्‍ला यांनी काही वर्षांपूर्वी पूनम अर्बन क्रेडिट को. ऑप. सोसायटीची स्थापना केली होती. त्यांनी सर्वसामान्य जनता, हात ठेल्यावर विक्री करणारे, भाजी विक्रेते, निवृत्त कर्मचारी आणि वर्ग 4 चे ज्येष्ठ कर्मचारी यांना योजनेत आकर्षक व्याज देण्याचे आमिष दाखविले होते. या संचालकांवर विश्वास ठेवून अनेक ठेवीदारांनी आपले पैसे सोसायटीमध्ये गुंतविले होते. काहींनी आवर्त ठेव म्हणून सोसायटीमध्ये आपल्या ठेवी ठेवल्या. ठेवीदारांचा विश्वास बसावा यासाठी ठेवीदारांना नियमित व्याज देण्यात आले होते. त्यामुळे ठेवीदारांचा या सोसायटीवर विश्वास बसला होता. मोठ्या प्रमाणात पैसे गोळा होताच पैशाची अफरातफर करण्याच्या हेतूने संचालकांनी खोटे कर्जदार तयार करून त्यांना कर्ज दिल्याचे कागदोपत्री दर्शविले. कर्ज घेतलेल्या लोकांनी कर्ज परत केले नाही, असा देखावा त्यांनी निर्माण केला. वास्तविक पाहता सोसायटीचे संचालक, व्यवस्थापक आणि एजंट यांनी ही अफरातफर करून कोट्यवधी रुपये स्वत:च्या खिशात टाकले. त्याचप्रमाणे ठेवीदारांना त्यांचे पैसे परत न करता त्यांची फसवणूक केली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: depositors robbed