देशी ‘मी टू’चा बोलका हुंकार

नागपूर - व्‍यासपिठावर उपस्‍थित डॉ. रश्‍मी पारसकर सोवनी, डॉ. स्वाती धर्माधिकारी, रुबिना पटेल, संदीप बर्वे, मिलिंद बारहाते.
नागपूर - व्‍यासपिठावर उपस्‍थित डॉ. रश्‍मी पारसकर सोवनी, डॉ. स्वाती धर्माधिकारी, रुबिना पटेल, संदीप बर्वे, मिलिंद बारहाते.

नागपूर - बसमध्ये गर्दीचा आसरा घेत, एका पुरुषाने रुचिताच्या कमरेत नंतर, छातीवर हात टाकला. स्पर्श चुकीचा असल्याची खात्री झाल्यावर तिने आवाज चढवला तर, म्हाताऱ्या पुरुषांवर असे आरोप करू नकोस म्हणून, बसमधील महिलांनीच तिला गप्प केले. मंदिरातील पुजाऱ्याने हातात प्रसाद ठेवताना शरीराने स्थूल असलेल्या अंकिताला तू बेडरूमच्या दिवानावरील मऊ मऊ गादीसारखीच आहेस, असे म्हणून तिचा विनयभंग केला. परंतु, इथे तमाशा नको म्हणून, शेजारच्या बायकांनीच तिला आणि तिच्या आईला गप्प केले. अमरीनच्या घरी आलेल्या पाहुण्यानेच तिच्यावर सतत अत्याचार केला, आईला सांगूनही कुटुंबाच्या इभ्रतीसाठी तिला गप्प बसविण्यात आले. पण आज त्या बोलत होत्या... आपल्यावर जाणत्या अजाणत्या वयात झालेल्या अत्याचाराचा टाहो भर सभागृहात फोडत होत्या.  

युवक क्रांती दल व सी. पी. ॲण्ड बेरार कॉलेजतर्फे आज धनवटे सभागृहात आयोजित ‘# देसी मी टू’ कार्यक्रमाच्या निमित्ताने बसमध्ये, रस्त्यावर, शाळेत, कोचिंगमध्ये, शेजारी आणि स्वतःच्या घरात झालेले नकोशे स्पर्श, वासनेने लबलबलेली नजर आणि अजाणत्या वयात कुसकरले गेलेले शरीर, मन... या सर्वांची आपबीती आज तरुण मुलींनी भर सभागृहात कथन केली. प्रमुख वक्‍ते डॉ. रश्‍मी पारसकर सोवनी, डॉ. स्वाती धर्माधिकारी, रुबिना पटेल, संदीप बर्वे व्यासपीठावर उपस्थित होते. अध्यक्षस्थानी मिलिंद बारहाते होते. रश्‍मी मदनकर यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमात मुलींनी ज्या दिवशी एखाद्या पुरुषाने त्रास दिला, अत्याचार केला त्या दिवशी घातलेले कपडे, आपले अनुभव आणि फोटो यांचे प्रदर्शन मांडले होते.

हिमंत तोडू शकत नाहीत
कार्यक्रमात तरुण मुलींसह, विवाहित स्त्रिया आणि वयस्कर महिलांनी गर्दी केली होती. मानवतावादी विचार करणाऱ्या पुरुषांची संख्याही लक्षणीय होती. नव्वदीतील मुक्ताबाई वाळके यांनी उपस्थित मुलींना आपल्या मनाविरुद्ध कुठलाच पुरुष आपल्या अंगावर हात घालू शकत नाही, त्यामुळे तुम्हीच खंबीर व्हा असा सल्ला दिला. तर, बाइकवर एकटीनेच प्रवास करणाऱ्या स्नेहलने आपल्यावर लहानपणीच झालेल्या अत्याचाराला वाचा फोडीत आता, जगभरातील वाईट नजरांना त्यांच्या गावात जाऊन ठेचून काढीत असल्याचे सांगितले. स्त्रीचे शरीर तोडले तरी, तिची हिंमत कुठलाही पुरुष तोडू शकत नसल्याचे मत मुलींनी व्यक्त केले. 

समाजाने पाठीशी उभे राहावे 
आपल्या समाजात रोज अत्याचार होतात. डॉक्‍टर, वकील, सीए, पत्रकार, पुजारी, बाप, भाऊ, काका, मामा अशा सर्वच वासनाधीन पुरुषांकडून मुलींवर अत्याचार होतात. परंतु, समाज या मुलींच्या पाठीशी उभे राहताना दिसत नाही. अनेकदा डोळ्यासमोर मुलींची छेड काढताना दिसूनही कानाडोळा केला जातो अथवा ‘चलता है’चा दृष्टिकोन ठेवला जातो. परंतु, ‘मी टू’ या चळवळीमुळे आता हे पुरुष धास्तावले आहेत. ‘मी टू’मुळे अत्याचारग्रस्त मुली, महिला बोलत्या झाल्या असून, कुजक्‍या मानसिकतेतून बाहेर पडून समाजाने महिलांच्या या आक्रोशाला साथ दिली पाहिजे, असे आवाहन डॉ. रश्‍मी पारसकर यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com