धानोऱ्यातील गावांचा दारूमुक्त निवडणुकीचा निर्धार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 ऑक्टोबर 2019

धानोरा (जि. गडचिरोली) : दारूविक्रेत्यांविरोधात अहिंसक कृतीसाठी प्रसिद्ध असलेल्या तालुक्‍यातील अनेक गावांनी दारूमुक्त निवडणुकीसाठी एल्गार पुकारला आहे. आपले अमूल्य मत दोन पैशांच्या दारूसाठी विकणार नाही. निवडणूक प्रचारादरम्यान गावात दारूचा वापर होऊ देणार नाही, असा निर्धार आतापर्यंत 28 गावांनी गावसभेच्या ठरावातून आणि रॅलीतून व्यक्त केला आहे.

धानोरा (जि. गडचिरोली) : दारूविक्रेत्यांविरोधात अहिंसक कृतीसाठी प्रसिद्ध असलेल्या तालुक्‍यातील अनेक गावांनी दारूमुक्त निवडणुकीसाठी एल्गार पुकारला आहे. आपले अमूल्य मत दोन पैशांच्या दारूसाठी विकणार नाही. निवडणूक प्रचारादरम्यान गावात दारूचा वापर होऊ देणार नाही, असा निर्धार आतापर्यंत 28 गावांनी गावसभेच्या ठरावातून आणि रॅलीतून व्यक्त केला आहे.
गावातील दारूविक्री पूर्णतः बंद असावी, यासाठी धानोरा तालुक्‍यातील अनेक गावे प्रयत्नशील आहेत. मुक्तिपथ गाव संघटनेच्या माध्यमातून महिला सातत्याने अहिंसक कृतीद्वारे दारूविक्रेत्यांवर कारवाई करीत आहेत. पण, निवडणूक काळात प्रचारादरम्यान दारूचा वापर होण्याची शक्‍यता असते. मतदारांचे अमूल्य मत मिळविण्यासाठी त्यांना दारूचे आमिष दाखविण्याचा प्रकारही घडतो. विधानसभा निवडणुकीदरम्यान असा कुठलाही प्रकार घडू नये म्हणून तालुक्‍यातील अनेक मुक्तिपथ गावसंघटना पुढे सरसावल्या आहेत. दारू पिणारा, दारूचे समर्थन करणारा व दारूबंदीला विरोध करणारा उमेदवार चालणार नाही, असे ठराव आतापर्यंत तालुक्‍यातील 28 गावांनी केले आहेत. तुकूम, नवरगाव, मिचगाव बू. पेंढरी, गिरोला, पैडी, पुस्टोला, पन्नेमारा, दुधमाळा, महावारा, साखेरा, झाडापापडा, पेकीनमडझा, गट्‌टेपायली, खुठगाव, कटेझरी, कारवाफा, गोडलवाही, रांगी, मुरूमगाव, चव्हेला, मुज्यालगोंदी, गुजनवाढी, तळेगाव, सायगाव, उडेगाव यासह इतरही गावांनी दारूमुक्त निवडणूक करण्याचा निर्धार केला आहे. गावागावांमध्ये दारूमुक्त निवडणूक करण्यासाठी रॅली काढून जनजागृती करीत आहेत. जो पाजील माझ्या नवऱ्याला दारू, त्या उमेदवाराला नक्कीच पाडू, असा सज्जड दमच महिलांनी घोषणांतून दिला आहे. ज्याला दारूबंदी नको, तो आमदार आम्हाला नको, असे ठाम मत मुक्तिपथ गाव संघटनेचे कार्यकर्ते व ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे.
गाव संघटनेची नजर
निवडणूक आचार संहितेतही प्रचारादरम्यान दारूच्या वापरावर प्रतबंध घातला आहे. त्यामुळे प्रचारादरम्यान कुणी मतदारांना दारूचे आमिष देत असल्यास तो गुन्हा आहे. त्यामुळे असा प्रकार होत असल्यास पोलिसांनी त्यावर कायदेशीर कठोर कारवाई करावी, अशी मागणी महिलांनी केली आहे. गावात या दरम्यान लपूनछपून येणाऱ्या दारूवर बारीक नजर गाव संघटनेच्या महिला ठेवून आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Determination of alcohol free elections in villages