एकाही घराच्या छपरावर कवेलू नसलेले गाव

शरद केदार
रविवार, 8 एप्रिल 2018

चांदूरबाजार - तालुक्‍यातील देऊरवाडा हे सहा हजार लोकसंख्येचे गाव. येथील नृसिंहाला नागरिक कुलदैवत मानतात. घरावर असलेले कवेलू हे नृसिंहाच्या नखांचे प्रतीक समजले जाते. त्यामुळे या गावात हिंदू असो वा अन्य कोणत्याही समाजाचे नागरिक आपल्या घरावर कवेलू शाकारणे वा ते टाकण्याचे धाडस करत नाहीत. 

घराच्या निर्माणकार्याचा पारंपरिक दृष्टिकोन येथे जोपासला जात असला, तरी गाव तथा तीर्थस्थळाच्या सर्वांगीण विकासासाठी अद्याप कुणीच पुढाकार घेतलेला नाही. दरवर्षी या ठिकाणी येणाऱ्या भाविकांच्या संख्येत वाढ होत असून सोयीच्या बाबतीत पुढाऱ्यांनीदेखील डोळ्यांवर पट्टी लावल्याचे दिसून येते.

विदर्भाची छोटी काशी म्हणूनही या गावाची ओळख आहे. अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्‍यात श्रीक्षेत्र देऊरवाडा गावाला शासनाने ‘क’ दर्जा दिलेला असला, तरी हे गाव पायाभूत सुविधांपासून आजही वंचित आहे. विशेष म्हणजे, या गावाला महाभारत काळापासून विशेष असे महत्त्व प्राप्त आहे. याच ठिकाणी भगवान नृसिंहाने हिरण्यकश्‍यपूचा वध केला, त्याच्या रक्ताने माखलेली नखे येथील पयोष्णी (पूर्णा) नदीत स्वच्छ केली. ही नखे वाळू लागून गळून पडली व नैसर्गिकरीत्या नृसिंहाची मूर्ती तयार झाल्याची आख्यायिका १६ ते १७ व्या शतकातील एक  प्राचीन धर्मग्रंथात आहे. या ठिकाणी स्नान करून पिंडदान केले तर पितर मुक्त होऊन वैकुंठास जातात, तर हवन व पूजा केल्यास नृसिंह प्रसन्न होऊन दारिद्य्र नष्ट होते, अशी भाविकांत श्रद्धा आहे. या गावात पयोष्णी तीरावर १८ तीर्थ आहेत. या ठिकाणी शाही स्नान करण्याकरिता अधिकमास तसेच श्रावणमासात भाविक गर्दी करतात. या गावात बालाजीची दोन मंदिरे असून या ठिकाणी दरवर्षी विजयादशमीपासून पाच दिवस उत्सव साजरा केला जातो. या वेळी जिल्ह्यातूनच नव्हे, तर बाहेरगावाहूनही भाविक मोठ्या संख्येने येत असतात. 

या गावाला धार्मिकदृष्ट्या महत्त्व असूनही अद्याप गावाचा विकास पाहिजे त्या प्रमाणात झालेला नाही. शासनाकडूनही फारसा निधी मिळालेला नाही. तत्कालीन सरपंच किरण सिनकर तसेच जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मनोहर सुने यांच्या प्रयत्नांतून सन २००० मध्ये शासनाकडून पर्यटनाचा ‘क’ दर्जा मिळाला. हा दर्जा प्राप्त झालेला असला तरी या तीर्थस्थळाच्या विकासासाठी शासनाकडून निधी खेचून आणण्यात जनप्रतिनिधी कमी पडले. परिणामी देऊरवाडा हे गाव अजूनही पर्यटन तसेच धार्मिक स्थळ विकासापासून कोसो दूर राहिल्याचा सूर येथे येणाऱ्या भाविकांतून निघत आहे.

Web Title: deurwada village home kaveli