महिला शेतकऱ्यांचा सामूहिक शेतीतून विकास

समाजासाठी आदर्श उदाहरण ठरलेल्या या "हिरकणी'
समाजासाठी आदर्श उदाहरण ठरलेल्या या "हिरकणी'

नागपूर  : निसर्गाचा लहरीपणा, सरकारचे उदासीन धोरण, भरमसाट मजुरी, खत व बियाण्यांमध्ये झालेली भाववाढ आणि अधूनमधून येणाऱ्या अस्मानी व सुलतानी संकटांमुळे शेती परवडत नसल्याचे निराशाजनक चित्र सध्या जागोजागी नजरेस पडते. मात्र, या परिस्थितीतही काही युवा महिलांनी सामूहिक शेतीचा प्रयोग यशस्वी करून केवळ आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभारच लावला नाही, तर निराशेच्या गर्तेत सापडलेल्या शेकडो-हजारो शेतकऱ्यांना जगण्याची नवी उमेदही दाखविली.
समाजासाठी आदर्श उदाहरण ठरलेल्या या "हिरकणी' आहेत नरखेड तालुक्‍यातील देवग्राम या छोट्या गावच्या. पतीच्या तुटपुंज्या कमाईत संसाराचा गाडा चालविताना होणारी घायतोड आणि डोक्‍यावर कर्जाचा दिवसेंदिवस वाढणारा डोंगर, यामुळे जीवन जगणे अवघड झाल्यानंतर खचून न जाता या गावातील चंदा सोनोले, हर्षा लोहे, मंगला लोहे, लता वासाडे, अर्चना मदापुरे, संध्या वासाडे, संगीता दोडके, सुनंदा वासाडे, शोभा चरडे, शारदा पांगूळ व उषा पांगूळ या तरुण महिला शेतकऱ्यांनी सामूहिक शेतीचा अनोखा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला. घरच्यांनी "आगे बढो' म्हटल्यानंतर या महिलांनी हे अवघड आव्हान स्वीकारले. "एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ' या उक्‍तीप्रमाणे या अकराही महिलांनी दिवस-रात्र शेतीत राबून उत्तम पीक घेत आजच्या काळात शेती परवडत नसल्याचा कांगावा करणाऱ्यांपुढे नवा आदर्श ठेवला.
2008 मध्ये स्थापन केलेल्या उन्नती महिला बचतगटाच्या या सदस्यांनी सुरुवातीला शासनाकडून मिळालेले अनुदान व बॅंकेतून घेतलेल्या कर्जातून धान्य खरेदी-विक्रीचा व्यवसाय सुरू केला. हा व्यवसाय महिलांच्या आवाक्‍याबाहेरचा वाटल्याने त्यांनी सामूहिक शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी सात एकर शेती ठेका पद्धतीने घेतली. जुने कर्ज फेडून तीन लाखांचे पुन्हा कर्ज घेतले. बऱ्यापैकी पीक आल्यानंतर त्यांचा आत्मविश्‍वास वाढला. पुन्हा कर्जाची प्रामाणिकपणे परतफेड करून यावेळी पाच लाखांचे कर्ज व दोन वर्षांसाठी 10 एकर शेती ठेक्‍याने घेतली. गतवर्षीही बऱ्यापैकी नफा झाल्याने यंदा 20 एकर शेती पुन्हा ठेक्‍याने घेतली. बॅंकेकडून अद्याप कर्ज मंजूर न झाल्याने नाउमेद न होता, स्वत:च पैशाची जुळवाजुळव करून शेतीला लावले. सकाळपासून सायंकाळपर्यंत शेतात राबून निंदण, खुरपणी व अन्य कामे स्वत: करू लागल्याने खर्चात मोठ्या प्रमाणावर बचत झाली.
मेहनतीसोबतच एकमेकींवर पूर्ण विश्‍वास असल्याने सर्वांचीच आर्थिक परिस्थिती सुधारली. मुलांचे पालनपोषण चांगल्याप्रकारे होऊ लागले. शिवाय आमदनी वाढल्याने व आर्थिक हातभार लागल्याने पतीदेवही खूष आहेत. एकूणच सामूहिक शेतीमुळे त्यांचे संपूर्ण आयुष्य बदलून गेले. प्रामाणिक मेहनत व वेळेवर पैसा लावल्यास शेती व्यवसाय तोट्यात नसल्याचे देवग्रामच्या "हिरकणीं'नी दाखवून दिले. उल्लेखनीय म्हणजे, त्यांचा सामूहिक शेतीचा प्रयोग शेती परवडत नसल्याचा कांगावा करून आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेणाऱ्या हजारो शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण ठरला आहे. त्यांच्या मेहनतीचे देवग्राममध्ये कौतुक होत आहे. गावातील इतरही महिला आता त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन असा विचार करू लागल्या आहेत.
000
महागाईच्या काळात पतीच्या कमाईत संसार चालविणे दिवसेंदिवस कठीण होत असल्याने आम्ही महिलांनी एकत्र येऊन शेती करण्याचा निर्णय घेतला होता. घरच्यांनी सपोर्ट केल्याने आम्हाला बळ मिळाले. प्रामाणिक मेहनत आणि एकमेकींवरील विश्‍वासामुळे सामूहिक शेतीचा प्रयोग यशस्वी झाला.
-हर्षा लोहे, महिला शेतकरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com