"ते' परत आले.... पण नागपूरला 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 डिसेंबर 2019

केंद्राच्या निधीची आम्ही कधीही प्रतीक्षा केली नाही. राज्य सरकारनेच तडकाफडकी निर्णय घेतले. केंद्राच्या निधीची प्रतीक्षा करण्याऐवजी राज्य सरकारने तत्काळ मदत करावी.

नागपूर :  भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादम्यान "मी पुन्हा येईन' असे सांगितले होते. मात्र त्यांना ते शक्‍य झाले नाही. यानंतर झालेल्या राजकीय उलथापालथीनंतर ते परत आले खरे, पण सत्तेत नाही तर आपल्या शहरात, नागपूरला. गेले पाच वर्षे मुख्यमंत्री म्हणून येणारे देवेंद्र फडणवीस रविवारी विरोधी पक्षनेता म्हणून संत्रानगरीत दाखल झाले.
 

 

महाविकास आघाडी सरकारला टोला 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी महाविकास आघाडी सरकारला टोला हाणत पुढील काळात आक्रमकपणे प्रश्‍न लावून धरण्याचे संकेत दिले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना हेक्‍टरी 25 हजार रुपये मदतीचे आश्‍वासन दिले होते. ते आश्‍वासन आता त्यांनी पूर्ण करावे, अशी अपेक्षा फडणवीस यांनी व्यक्त केली. 

Image may contain: 17 people, crowd

आम्ही तडकाफडकी निर्णय घेतले 
केंद्राच्या निधीची आम्ही कधीही प्रतीक्षा केली नाही. राज्य सरकारनेच तडकाफडकी निर्णय घेतले. केंद्राच्या निधीची प्रतीक्षा करण्याऐवजी राज्य सरकारने तत्काळ मदत करावी. केंद्राकडून निधी आल्यानंतर तो राज्याच्या तिजोरीत वळता करावा, असा सल्लाही त्यांनी यावेळी सरकारला दिला. सव्वा महिन्याच्या राजकीय घडामोडीनंतर शहरात आलेले माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चाहत्यांनी केलेल्या उत्स्फूर्त स्वागताने भारावले. विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी भाजपच्या झेंड्यांसह हजारो चाहते उपस्थित झाले. त्यामुळे संपूर्ण विमानतळ परिसर भाजपमय झाल्याचे चित्र आहे. 

विमानतळावरून बाहेर येताच भाजप कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी एकच जल्लोष केला. शहर भाजप अध्यक्ष प्रवीण दटके, महापौर संदीप जोशी, माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी महापौर नंदा जिचकार, माजी आमदार मिलिंद माने, संदीप जाधव, अशोक मेंढे, महामंत्री किशोर पलांदूरकर, उपमहापौर मनीषा कोठे, मुन्ना यादव, स्थायी समिती अध्यक्ष प्रदीप पोहाणे, प्रदेश प्रवक्‍त्या अर्चना डेहनकर, रमेश भंडारी, बंडू राऊत, संजय ठाकरे, किशन गावंडे, शिवाणी दाणी, चेतना टांक, डॉ. कीर्तिदा अजमेरा, प्रभाकर येवले, भूषण शिंगणे, दिलीप चौधरी, नागेश सहारे, किशोर वानखेडे, अमर पारधी, रूपा राय, परशू ठाकूर, ऍड. धर्मपाल मेश्राम, मनीषा काशीकर, अभय दीक्षित, दीपराज पार्डीकर, वर्षा ठाकरे, चंदन गोस्वामी, सुरेंद्र पांडे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी फडणवीस यांना मोबाईल कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी अनेकांनी गर्दी केली. भारतीय जनता पार्टीचा विजय असो, भारत माता की जय आदींचा जयघोष करीत ढोल, नगाड्याच्या आवाजात तसेच आतषबाजीसह चाहते व कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. 

महत्त्वाची बातमी - वेगळा विदर्भच्या मुद्यावर भाजपच्या केवळ थापाच : नितीन राऊत

पंकजा मुंडेसह अनेक माजी मंत्र्यांची उपस्थिती 
माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कन्या डॉ. शलाका यांचा विवाह आज नागपुरात पार पडला. या समारंभासाठी पंकजा मुंडे यांच्यासह अनेक माजी मंत्री, भाजपचे नेते नागपुरात आले होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: devendra fadanvis grand welcome at nagpur airport