बुद्धाच्या विचारातून जगाला शांतीचा मार्ग गवसेल - देवेंद्र फडणवीस

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 ऑक्टोबर 2016

नागपूर - तथागत गौतम बुद्धांनी जगाला शांतीचा मार्ग दिला. त्यांचा शांतीचा संदेश ज्या देशांनी आत्मसात केला ते देश आज विकासाच्या प्रगतिपथावर वाटचाल करीत आहेत. जपान या देशाच्या प्रगतीचे मूळ कारण तेथे रुजलेल्या बुद्धांच्या विचारांमध्ये आहे. जगाला बुद्धांच्या विचारातूनच शांतीचा मार्ग गवसेल, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी व्यक्त केले. 

नागपूर - तथागत गौतम बुद्धांनी जगाला शांतीचा मार्ग दिला. त्यांचा शांतीचा संदेश ज्या देशांनी आत्मसात केला ते देश आज विकासाच्या प्रगतिपथावर वाटचाल करीत आहेत. जपान या देशाच्या प्रगतीचे मूळ कारण तेथे रुजलेल्या बुद्धांच्या विचारांमध्ये आहे. जगाला बुद्धांच्या विचारातूनच शांतीचा मार्ग गवसेल, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी व्यक्त केले. 

ड्रॅगन पॅलेस येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. केंद्रीय भूपृष्ठ व रस्ते वाहतूक जहाज बांधणीमंत्री नितीन गडकरी, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, सामाजिक न्याय व विशेष साहाय्यमंत्री राजकुमार बडोले, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार कृपाल तुमाने, आमदार डॉ. मिलिंद माने, ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या संस्थापक ॲड. सुलेखा कुंभारे उपस्थित होते. 

मुख्यमंत्री फडणवीस यांनी तथागत गौतम बुद्धांच्या मूर्तीचे दर्शन घेऊन बुद्धवंदना ग्रहण केली. दीक्षाभूमी, ड्रॅगन पॅलेस, शांतिवन येथे देश-विदेशांतून नागरिक येतात. या भाविकांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. फडणवीस यांच्या हस्ते दादासाहेब कुंभारे मल्टिपर्पज ट्रेनिंग इन्स्टिट्यूट इमारतीच्या पहिल्या टप्प्याचे उद्‌घाटन झाले. राष्ट्रीय राजमार्ग क्रमांक ७ पासून ड्रॅगन पॅलेसला जोडणाऱ्या पोचमार्गावर रेल्वे उड्डाणपुलाच्या बांधकामाचे भूमिपूजन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. 

फडणवीस म्हणाले, ड्रॅगन पॅलेस येथे तथागत गौतम बुद्धांच्या पंचशील तत्त्वाची, दिव्यत्त्वाची आणि असिम शांततेची अनुभूती प्राप्त होते. दीक्षाभूमी आणि ड्रॅगन पॅलेस येथे येणाऱ्या भाविकांच्या सुविधेसाठी रेल्वे उड्डाणपुलाची निर्मिती लवकरच करण्यात येईल. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी म्हणाले, धम्मचक्र प्रवर्तनदिनाच्या निमित्ताने दरवर्षी नागपूर येथे लाखो भाविक येतात. दीक्षाभूमी, ड्रॅगन पॅलेस आणि शांतिवन या तिन्ही ठिकाणांना बुद्धिस्ट सर्किट म्हणून मान्यता मिळाली. ड्रॅगन पॅलेस येथील तथागत गौतम बुद्धांची संपूर्ण चंदनाची मूर्ती भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. ड्रॅगन पॅलेसच्या विकासासाठी ॲड. सुलेखा कुंभारे यांचा अतिशय मोलाचा वाटा आहे. समाजसेवेचे हित लक्षात ठेवून चालविलेले कार्य पुढेही असेच सुरू ठेवावे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, दादासाहेब कुंभारे मल्टिपर्पज ट्रेनिंग इन्स्टिट्यूट येथे यंत्रमाग विकसित करून येथील महिलांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून द्यावा. कौशल्य विकासावर आधारित टाटा कन्सलटन्सीसारख्या कंपन्यांना येथे बोलवावे. येथील युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात यावा. संचालन राहुल बागडे यांनी केले. आभार वंदना भगत यांनी मानले.

Web Title: dhammachakra pravartak din mahotssav in nagpur