‘बुद्धाकडे जनता वळे...’

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 ऑक्टोबर 2016

निळ्या पाखरांनी फुलली दीक्षाभूमी - पाच हजार अनुयायांनी घेतली दीक्षा

निळ्या पाखरांनी फुलली दीक्षाभूमी - पाच हजार अनुयायांनी घेतली दीक्षा
नागपूर - हाती पंचशीलाचे झेंडे... सोबत चिलेपिले... डोक्‍यावर गाठोडं... घेतलेल्या भीमाच्या लेकरांनी ६० व्या धम्मचक्र प्रवर्तनदिन सोहळ्यासाठी रविवारी दीक्षाभूमी गाठली. अनेक जण कवी वामनदादा कर्डकांचे ‘बुद्धाकडे जनता वळे, भीमा तुझ्या जन्मामुळे...’, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो...’ ‘बाबासाहेब करे पुकार बुद्ध धम्म का करो स्वीकार...’ असा जयघोष करीत होते. अनुयायांचा ओघ सुरूच असून, उद्या (ता. १०) सर्वाधिक भीमबांधव येणार असल्याचे सांगितले जाते. आज पहिल्याच दिवशी पाच हजारांच्या वर अनुयायांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली.  

भदन्त आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्या नेतृत्वात विविध राज्यांसह विदेशांतून आलेल्यांना बौद्धाची धर्माची दीक्षा दिली जाते. दरवर्षी हा आकडा मोठा असतो. यंदाही पहिल्याच दिवशी दीक्षा घेण्यासाठी मोठ्या संख्येत गर्दी झाली. सोमवारी गर्दी अधिक वाढणार आहे. याशिवाय श्रामणेर दीक्षा घेणाऱ्यांची संख्याही यंदा वाढली. विदेशातूनही मोठ्या संख्येत अनुयायी पोहोचले आहेत. यंदा दीक्षाभूमीवर येणाऱ्या अनुयायांची संख्या मोठी असेल, असा अंदाज वर्तविला जात आहे. दीक्षा सोहळ्याचे हीरकमहोत्सवी वर्ष असल्याने धम्मचक्र प्रवर्तनदिनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. यातच सोशल मीडियाचा प्रभावही मोठ्या प्रमाणात बघायला मिळत आहे. केरळ, कर्नाटक, तमिळनाडू, बिहार राज्यांतून मोठ्या संख्येने अनुयायी उपराजधानीत दाखल झालेत. रविवारी दुपारी भन्ते आर्य नागार्जुन सुरई ससाई यांनी धम्मदीक्षा देण्यास सुरवात केली. पहिल्याच दिवशी हा आकडा पाच हजारांच्या वर पोहोचला. बौद्ध धर्माची दीक्षा घेणाऱ्यांना लगेच प्रमाणपत्र दिले जाते. त्यांची रीतसर नोंदही होते.  

कर्नाटक सरकारचे विशेष प्रेम
कर्नाटकमध्ये कार्यरत काँग्रेस सरकारचे दीक्षाभूमीवर विशेष प्रेम आहे. गेल्या वेळी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील सामाजिक न्यायमंत्री एच. अंजय्या यांना सोहळ्यासाठी खास पाठविले होते. त्या वेळी कर्नाटक सरकारने दीक्षाभूमीला मोठा निधी दिला होता. यंदा अंजय्या पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. 

रेल्वे फुल्ल... हॉटेल हाउसफुल्ल...
मुंबईहून आलेली सेवाग्राम, विदर्भ, कोल्हापूरहून आलेल्या महाराष्ट्र एक्‍स्प्रेससह विविध राज्यांतून नागपूरमार्गे धावणाऱ्या रेल्वेतून बौद्ध अनुयायी मोठ्या संख्येने रेल्वेस्थानकावर उतरत आहेत. मुख्य रेल्वे स्थानक व अजनी रेल्वेस्थानक परिसरही गर्दीने फुलून गेला. विविध संस्थांतर्फे या दोन्ही रेल्वेस्थानक परिसरात अनुयायांसाठी नाश्‍ता व जेवणाची व्यवस्था केली आहे. तसेच इंदोरा बुद्धविहार, बुद्धनगरातील बुद्ध पार्क, धरमपेठ येथील बुद्धविहार, माटे चौकातील बुद्धविहार, सेमिनरी हिल्स, अंबाझरी, पांढराबोडी आदी भागांसह अनेक भागात अनुयायी जात होते. जत्थ्याजत्थ्याने प्रत्येक राज्यांतून जिल्हानिहाय अनुयायांची पावले दीक्षाभूमीच्या दिशेने येत होती.

केरळहून विशेष विमान
धम्मचक्रप्रवर्तन दिनासाठी केरळहून जवळपास दोनशे जण विशेष विमानाने नागपुरात आले. या राज्यात विविध विभागांत कार्यरत असलेले मोठ्या पदांवरील अधिकारी व त्यांच्या कुटुंबीयांचा यात समावेश आहे. तमिळनाडूतूनही दरवर्षी अनुयायी वाढत असतात. यातील बहुतांश धरमपेठेतील बुद्धविहारात मुक्कामाला असतात. संख्या वाढल्याने आता काही आमदार निवासातही मुक्कामाला आहेत. या दोन राज्यांसह उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, मध्य प्रदेश, तेलंगणा, आंध्र प्रदेश, दिल्ली, ओडिशा या राज्यासह इतरही राज्यांतून दीक्षाभूमीवर येणाऱ्या अनुयायांच्या संख्येत दरवर्षी वाढ होत आहे.

Web Title: dhammachakra pravartandin sohala in nagpur

टॅग्स