बाबासाहेबांमुळेच देश अखंड - मुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 ऑक्टोबर 2016

नागपूर - हा देश शेकडो खंडांत विभागला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भारतीय संविधानाच्या सांस्कृतिक ऐक्‍यातून देश अखंड झाला. या अखंड राष्ट्राची विकासाकडे, सामाजिक न्यायाच्या दिशेने सुरू असलेली वाटचाल ही संविधानातून होत आहे. बाबासाहेब हे राष्ट्रनिर्माते होते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी येथे केले. 

नागपूर - हा देश शेकडो खंडांत विभागला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भारतीय संविधानाच्या सांस्कृतिक ऐक्‍यातून देश अखंड झाला. या अखंड राष्ट्राची विकासाकडे, सामाजिक न्यायाच्या दिशेने सुरू असलेली वाटचाल ही संविधानातून होत आहे. बाबासाहेब हे राष्ट्रनिर्माते होते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी येथे केले. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मदीक्षेच्या हीरकमहोत्सवी सोहळ्यात नागपूरच्या दीक्षाभूमीवर मंगळवार, ११ ऑक्‍टोबरला मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. प्रमुख पाहुणे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, महापौर प्रवीण दटके, आमदार डॉ. मिलिंद माने, आमदार प्रकाश गजभिये, आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे उपस्थित होते. अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भदन्त आर्य नागार्जुन सुरई ससाई होते. 

दसऱ्याच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आम्हाला युद्ध नको ही बुद्धाची भूमी आहे’ असे सांगितल्याचा उल्लेख करीत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मानवाने मानवाला जोडणारा बुद्ध धम्म या दीक्षाभूमीवर लाखो लोकांना दिला. जगातील बौद्ध राष्ट्रांची प्रगती झाल्याचे चिंतन बाबासाहेबांना होते. यामुळेच प्रगतीच्या दिशेने झेप घेणारा अखिल मानवाला जोडणारा बौद्ध धम्म येथे दिला. संविधानाच्या माध्यमातून देश विकासाकडे झेप घेत आहे. सामाजिक न्याय देशात प्रसारित आहे. शिक्षणाची संधी साऱ्यांना मिळत आहे. भारतीय संविधानात सर्वच प्रश्‍नांची उत्तरे आहेत. यामुळेच देश अखंड राहिला असल्याचेही फडणवीस म्हणाले.

मुंबईच्या इंदू मिलच्या जागेवर बाबासाहेबांच्या विचारांच्या स्मारकाचा सर्वसमावेश आराखडा तयार झाला आहे. दीक्षाभूमीच्या विकासाचाही आराखडा तयार आहे. अमरावती येथे दादासाहेब उपाख्य रा. सू. गवई यांच्या  स्मारकासाठी २५ कोटी देण्याची घोषणा यावेळी त्यांनी केली. सूरमणी प्रभाकर धाकडे, छाया वानखेडे यांच्या गीत गायनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. संचालन अशोक जांभूळकर यांनी केले. प्रास्ताविक सदानंद फुलझेले यांनी केले. आभार विजय चिकाटे यांनी मानले. 

ॲट्रॉसिटी कायदा रद्द होणार नाही
ॲट्रॉसिटी कायदा रद्द करण्याचा विचार केंद्र व राज्य सरकारचा नाही. बाबासाहेबांचे अनुयायी याचा दुरुपयोग करू शकत नाहीत आणि तसे करणारे बाबासाहेबांचे अनुयायी नसल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. मराठ्यांचे मोर्चे दलितांच्या विरोधात नाहीत. त्यामुळे कोणीही अस्वस्थ होण्याचे कारण नाही. प्रत्येक मागासांना आरक्षण देण्याची तरतूद संविधानात असून ते बहाल करण्याची जबाबदारी बाबासाहेबांनी आम्हाला संविधानाच्या माध्यमातून दिली असल्याचे सांगत मराठ्यांना आरक्षण देण्याबाबत सकारात्मक असल्याचे स्पष्ट केले.

Web Title: dhammadiksha hirakmahotsavi sohala in nagpur

टॅग्स