धनवटे रंगमंदिराचा पडदा केव्हा उघडणार?

धनवटे रंगमंदिराचा पडदा केव्हा उघडणार?


नागपूर : निळू फुले, श्रीराम लागू, नाना पाटेकर, मोहन जोशी यांच्यासारख्या दिग्गज नाट्यकलावंतांच्या अभिनयाचा संपूर्ण वैदर्भीयांना आस्वाद देणारे, एकेकाळी नाट्य कलावंतांचा कट्टा म्हणून ओळखले जाणारे सीताबर्डीवरील धनवटे रंगमंदिराचा आता "वाडा चिरेबंदी' होऊ लागला आहे. सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी सुरू झालेले बांधकाम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे पडद्यामागे नेमके काय शिजते आहे हे कळायला मार्ग नाही. 
वैदर्भीय साहित्यिकांसाठी धनवटे रंगमंदिर नेहमीच आधारकेंद्र राहिले आहे. अनेकदा या संस्थेचे सक्रिय योगदान मिळाले नाही म्हणून थेट साहित्य चळवळ थंडावल्याचेदेखील संस्थेवर आरोप झाले आहे. मात्र प्रत्येक प्रसंगात संस्थेने स्वत:चे वर्चस्व बेधडकपणे सिद्ध केले आहे. संकुलातील रंगमंदिराचे उद्‌घाटन कधी होणार, असा प्रश्‍न संस्थेच्या प्रवासात एक नव्हे तर अनेकदा विचारण्यात आला. मात्र आज या प्रश्‍नाचे उत्तर कोण देईल, हाच प्रश्‍न आहे. कारणे अनेक आहेत, मात्र उत्तर अद्याप सापडलेले नाही. 
सांस्कृतिक संकुलाच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा शिलान्यास 29 डिसेंबर 1993 रोजी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या हस्ते झाला होता. याचा गेल्याच वर्षी रौप्यमहोत्सव झाला. त्याकाळी शेवाळकर बिल्डर्सकडे सांस्कृतिक संकुलाच्या बांधकामाचे कंत्राट देण्यात आले. संकुलाची संकल्पना व रचनेचा आराखडा शेवाळकर बिल्डर्सने तयार केला. त्यानुसार सातमजली इमारतीतील खालचे तीन मजले व्यावसायिकदृष्ट्या वापरले जातील व वरचे चारही मजले वि. सा. संघाच्या अखत्यारित राहतील असा निर्णय घेण्यात आला. तर या जागेत मिनी थिएटर, कलादालन, ध्वनिमुद्रणाचा स्टुडिओ, अभ्यागत दालने, कार्यालय, सभागृह, पार्किंग, ऍम्पी थिएटर, टेरेस गार्डन, सुशोभित दीर्घा आदींचा समावेश करण्यात आला होता. त्यानुसार कलादालन, ध्वनिमुद्रणाचा स्टुडिओ, कार्यालय आदींचे काम पूर्ण झाले आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com