...तर भारत विश्‍वमांगल्याची राजधानी - डॉ. मोहन भागवत

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 डिसेंबर 2016

नागपूर - समाजात सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांबद्दल सन्मानाची भावना रुजविण्याचे कार्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे करण्यात येते. या कार्यात समाजानेसुद्धा पाठबळ दिल्यास भारत विश्‍वमांगल्याची राजधानी ठरेल, असा विश्‍वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केला. 

नागपूर - समाजात सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांबद्दल सन्मानाची भावना रुजविण्याचे कार्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे करण्यात येते. या कार्यात समाजानेसुद्धा पाठबळ दिल्यास भारत विश्‍वमांगल्याची राजधानी ठरेल, असा विश्‍वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केला. 

रेशीमबाग मैदानावर सुरू असलेल्या धर्मसंस्कृती महाकुंभांतर्गत शनिवारी शहीद जवानांचे कुटुंबीय व वीर सैनिकांचा सन्मानाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. संत, संघ आणि सेना असा त्रिवेणी योग या कार्यक्रमानिमित्त जुळून आला. ज्योतिषपीठाधीश्वर शंकराचार्य स्वामी वासुदेवानंद सरस्वती अध्यक्षस्थानी होते. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, मध्यप्रदेशचे ऊर्जामंत्री पारस जैन, सेनेचे जनरल ॲडमिरल निर्मलचंद वीज, लेफ्टनन्ट जनरल सय्यद अता होस्नेन, वायुसेनेचे एअर मार्शल भूषण गोखले, लेफ्टनन्ट कर्नल जी. एस. जॉली, लेफ्टनन्ट कर्नल सुनील देशपांडे, योगी आदित्यनाथ महाराज, हम्पीपीठाधीश्वर शंकराचार्य विद्यारण्यभारती स्वामी, श्रीदेवनाथ मठाचे पीठाधीश्‍वर जितेंद्रनाथ महाराज, राष्ट्रसेविका समितीच्या शांताक्का आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते सुमारे दीडशे वीरपत्नी, वीरमातांचा तसेच शौर्याचा परिचय देणाऱ्या सैनिकांचा सत्कार करण्यात आला. 

डॉ. भागवत यांनी देवभक्तीसोबतच देशभक्तीही समाजमान्य असावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. शंकराचार्य स्वामी वासुदेवानंद सरस्वती यांनी संत आणि सैनिक देशाचे रक्षक असल्याचे सांगितले. 

सैनिकांचे कार्य घराघरात पोहचून त्यांच्याविषयी समाजात आदराचे स्थान निर्माण करण्याचे स्वयंसेवकांचे प्रयत्न निश्‍चितच यशस्वी होतील, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. जितेंद्रनाथ महाराज म्हणाले, सैनिक असतो, तिथे संतही असतात. संतांच्या कार्यावर समाजानेही आचरण करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. प्रारंभी बिगुलाच्या ध्वनीत अमरज्योती प्रज्वलित करून वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. ॲडमिरल जनरल वीज यांच्या हस्ते चक्रार्पण करून पुष्पांजली अर्पण करण्यात आली.

धर्मसंस्कृती महाकुंभात विक्रमाची नोंद
नागपूर - धर्मसंस्कृती महाकुंभांतर्गत हजारो साधुसंतांच्या उपस्थितीत अनोख्या विक्रमाची नोंद झाली. एकाच वेळी २३ हजारांहून अधिक महिलांनी शिवमहिम्न स्रोताचे वाचन करीत हा विक्रम नोंदविला. 

उपराजधानीच्या संघभूमीत आयोजित धर्मसंस्कृती महाकुंभांतर्गत आज मातृसंसदेचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी शिवमहिम्न स्रोताचे सामूहिक पठण करण्यात आले. या उपक्रमासाठी २३ हजार महिलांनी नावे नोंदविली होती. याशिवास, उपस्थित पुरुष मंडळी आणि साधुसंतांनी स्रोताचे पठण केले. या उपक्रमाची पूर्वसूचना इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड व एशिया बुक ऑफ रेकॉर्डला देण्यात आली होती. दोन्ही संस्थांतर्फे डॉ. सुनीता धोटे या उपस्थित होत्या. साधुसंतांच्या उपस्थितीत हजारो महिलांनी एकाच वेळी शिवमहिम्न स्रोताचे वाचन सुरू केले. डॉ. धोटे यांनी या उपक्रमात २३ हजार ३० महिलांनी सहभाग घेतल्याची तसेच विक्रमाची नोंद झाली असल्याची घोषणा व्यासपीठावरून केली. या उपक्रमामुळे उपराजधानीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला.

Web Title: dharmsanskruti mahakumbh in nagpur