यवतमाळात त्यांनी मातीतून काढलं सोनं? शेतकऱ्यांची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 24 December 2019

येथील पडगिलवार ले-आउटमधील पलीकोंडावार संकुलातील अपार्टमेंटमध्ये वास्तव्यास असलेल्या व्यक्तीची झडती घेतली असता एअर पिस्टल व धारदार चाकू जप्त करीत त्याला अटक करण्यात आली. पोलिसांनी त्याची अधिक चौकशी केली असता हा संशयित आपल्या साथीदारासह शेतामधून सोनं काढून देतो, असे सांगून अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घालीत असल्याची बाबही उघड झाली. गोविंद प्रल्हाद बळी (वय 33, रा. घाटोडी, ता. पुसद) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे. 

दिग्रस (जि. यवतमाळ) : गोविंद बळी याच्याकडे धारदार शस्त्र व गावठी बनावटीचे पिस्टल असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार दिग्रसचे पोलिस निरीक्षक सोनाजी आमले यांनी आपल्या पथकासह त्याच्या घराची झडती घेतली. त्यात त्याच्याकडून एक 12.5 इंचांचा मोठा चाकू व एक एअर पिस्टल आढळून आले. या शस्त्रांबाबत विचारणा केली असता, चाकू हा नांदेड येथून, तर पिस्टल वाशीम येथून आणल्याची कबुली त्याने दिली. 

समोरच्या व्यक्तीला केले मोहित 

आरोपीची कसून चौकशी केली असता तो व त्याचा साथीदार संतोष प्रल्हाद पांडे (वय 35, रा. वटफळ ता. मानोरा जि. वाशीम) याच्यासोबत ग्रामीण भागातील श्रीमंत शेतकऱ्यांचा शोध घेत असत. त्यानंतर त्यांना विश्वासात घेऊन तुमच्या शेतामध्ये सोनं आहे, असे प्रलोभन देऊन सोन्याचे आमिष दाखवीत असे व आमच्याकडे पायाळू माणूस आहे.

त्याला जमिनीखाली असलेले सोने व पाणी दिसते. याशिवाय आमच्याकडे नागमणी आहे. त्यामुळे आम्ही जमिनीखाली असलेले सोने सहज काढू शकतो, असे सांगत समोरच्या व्यक्तीला मोहित करून त्याला शेतातून सोनं काढून देण्याचं आमिष द्यायचे. त्या बदल्यात त्याच्याकडून लाखो रुपये घेऊन त्यांना गंडा घालीत असल्याची कबुलीने संशयित गोविंद बळी याने दिली. 

Image may contain: food

भांड्यात माती भरून सोन्याची झळाळी 

दरम्यान, या दोन्ही संशयितांनी आतापर्यंत ग्राम फेटरा, फौजी ढाब्याजवळ, ग्राम रतनवाडी ते शिवणीदरम्यान फुलउमरी शेंदूरजना (ता. मानोरा), धानोराजवळील कळवा, इगलवाडी ते वटफळ शिवारात, घाटोडी एमआयडीसी परिसरात, मंगरूळपीरजवळ, वाडी मंगरूळपीरजवळ, अनसिंगच्या अलीकडील घाटाजवळील

अनेकांच्या शेतात सोने म्हणून नव्या भांड्यात माती भरून नवीन कपड्याने त्याला बांधून त्यात सोने असल्याचे भासवून अनेकांची फसवणूक केली आहे, अशी कबुलीही संशयित गोविंद बळी याने पोलिसांना दिली. 

क्‍लिक करा : कोणी सोने विकत घेता का होऽऽ

सशर्त जामीन मंजूर 

त्यावरून त्याच्यावर हत्यार बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, संशयित बळी याला सोमवारी (ता.23) दिग्रस न्यायालयात हजर केले असता, त्याला सशर्त जामीन मंजूर करण्यात आला. याबाबतचा पुढील तपास ठाणेदार सोनाजी आमले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करीत आहेत. 

हेही वाचा की : असे काय घडले की ती ताठपणे चालायला लागली
 

अशी करायचा शेतकऱ्यांची फसवणूक? 

आरोपी हे शेतामध्ये आधीच बेन्टेक्‍सचे दागिने लपवून ठेवायचे. त्यानंतर एखाद्या रात्री जाऊन त्या ठिकाणी सोनं असल्याची बतावणी करायचे व तेथे रात्रीच पूजा केली जायची. पूजा करीत असताना संबंधित शेतकऱ्यास काही अंतरावर अंधारात थांबण्यास सांगायचे.

त्यानंतर एखाद्या नव्या भांड्यात माती भरून त्यामध्ये सोनं असून, भांडं कपड्याने बांधून आहे. त्यामुळे हे भांडे सहा महिने उघडू नका, नाहीतर सोन्याची माती होईल, असे सांगून ते भांडं संबंधित शेतकऱ्याला देऊन त्याच्याकडून ठरलेली रक्कम घेऊन आरोपी निघून जायचे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Did they extract gold from the soil in Yavatmal? Farmers cheat