यवतमाळ : एसटी बसमधील डिझेलची चोरी

डॉ. गजानन वैद्य
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

परिवहन महामंडळाच्या एसटी बसमधील 150 लिटर डिझेल चोरट्यांनी लंपास केल्याची घटना आज सोमवारी (ता. 9) सकाळी उघडकीस आली.

फुलसावंगी (जि. यवतमाळ) : गावात मुक्कामी येत असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसमधील 150 लिटर डिझेल चोरट्यांनी लंपास केल्याची घटना आज सोमवारी (ता. 9) सकाळी उघडकीस आली. या चोरीप्रकरणी बिटरगाव येथील पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

येथून जवळच असलेल्या निंगणूर येथे राज्य परिवहन महामंडळाची बस रोजच मुक्कामी येते. त्यानुसार काल रविवारी (ता.8) देखील निंगणूर-पुसद ही पुसद आगाराची बस (क्रमांक एम. एच. 40-एक्यू 6170) निंगणूर या गावी मुक्कामी आली. मात्र या बसमधील अंदाजे 150 लिटर डिझेल चोरट्यांनी चोरून नेल्याने ही बस नियोजित वेळेवर सुटली नाही. बसचालक शेख सलीम शेख रहिम (रा. पुसद) यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी त्वरित पुसद येथील आगार प्रमुखांशी संपर्क केला. त्यानंतर बिटरगाव पोलिस ठाण्यात याबाबतची तक्रार दाखल करण्यात आली. याबाबतचा पुढील तपास बिटरगाव पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक विजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली बीट जमादार विष्णू कोरडे हे करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Diesel theft on ST bus in yavatmal district