रुग्णाच्या जेवणात निघाले शेण?

file photo
file photo

नागपूर : आशिया खंडातील सर्वांत मोठ्या अशा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) किचनमधून वॉर्डात रुग्णांना दिलेल्या जेवणातून शेणसदृश गोळा निघाला. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. हा किळसवाणा प्रकार येथील वॉर्ड क्रमांक 2 मध्ये घडला असून दुर्गंधीयुक्त गोळा तपासणीसाठी आहारतज्ज्ञाकडे देण्यात आला असल्याची माहिती पुढे आली.
प्रशासनाकडून तातडीने या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. परंतु ही वस्तू शेण की माती याबाबतचे सारे आरोप प्रशासनाने नाकारले असून सुपारी असल्याचे सांगण्यात येत आहे. उमेश पवार असे रुग्णाचे नाव आहे. त्याच्यावर अस्थिव्यंगोपचार विभागाच्या वॉर्ड क्रमांक 2 मधील खाट क्रमांक 20 वर मागील दहा दिवसांपासून उपचार सुरू आहेत.
मंगळवारी सांयकाळी रुग्णांना जेवण देणारी गाडी वॉर्डासमोर आली. कर्मचाऱ्यांनी आवाज दिला. पोळी, पालकाची दाळभाजी, भात या पदार्थांचा समावेश होता. जेवण करताना रुग्णाला एका सुपारीच्या आकाराचा नरम गोळा तोंडात गेला. काहीतरी चुकीची वस्तू असल्याचे दिसून आले. यामुळे ही नरम वस्तू सुपारी आहे की शेण आहे की मातीचा गोळा, यावर चर्चा करतानाच या वस्तूची दुर्गंधी येत असल्याने रुग्णाचे नातेवाईक संतप्त झाले. त्वरित वॉर्डातील इन्चार्ज सिस्टरकडे तक्रार केली. परिचारिकेने ही माहिती वैद्यकीय अधीक्षक कार्यालयाला दिली. अधिकाऱ्यांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून बुधवारी एक अंतर्गत समितीच्या सहकार्यातून चौकशी सुरू केली आहे. 2010 पर्यंत मेडिकलमध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाचे अधिकारी प्रतिनियुक्तीवर कार्यरत असताना दर दिवसाला किचनमधून आलेले "ताट' तपासण्यात येत असे. जेवण तयार होत असताना आकस्मिक भेट हे अधिकारी देत असत. परंतु अलीकडे किचनमधील हे सारे व्यवहार ठप्प पडले, अशी चर्चा आहे.
मेडिकलच्या किचनमध्ये दररोज दीड हजार रुग्णांचे जेवण तयार होते. स्वच्छतेसह सुरक्षेची काळजी घेतली जाते. रुग्णाच्या जेवणात शेण किंवा मातीसदृश गोळा असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मात्र तक्रार आल्यामुळे प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत चौकशी समिती गठित करण्यात आली. अहवालानंतर वास्तव पुढे येईल.
- डॉ. सजल मित्रा, अधिष्ठाता, मेडिकल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com